
ठाणे : १,२४६ हून अधिक गुंतवणूकदार आणि सुमारे १८० कोटी रुपयांच्या कथित गुंतवणूक प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात सचिन राणे याच्या विरोधात येस बँक लिमिटेडनेही न्यायालयात अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे येथे उपलब्ध न्यायालयीन नोंदीनुसार, येस बँक लिमिटेडने आपल्या अधिकृत प्रतिनिधीमार्फत दाखल केलेल्या प्रकरणात सचिन बालकृष्ण राणे यांच्यासह संबंधित पक्षांचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेने नोंदविलेल्या गुन्ह्याशी संबंधित असल्याचे न्यायालयीन कागदपत्रांवरून दिसून येते. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या FIR मध्ये भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यांतर्गत विविध कलमे लागू करण्यात आली आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ जून २०२६ रोजी होणार आहे.
गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार, सुमारे १,२४६ गुंतवणूकदारांचे १८० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे नुकसान झाले असून अनेक कुटुंबांची आयुष्यभराची बचत या प्रकरणात अडकली आहे. गुंतवणूकदारांनी दोषींवर कठोर कारवाई करून मालमत्ता जप्त करावी व गुंतवणूकदारांचा पैसा परत मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, येस बँकेने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जामुळे या बहुचर्चित प्रकरणातील आर्थिक व्यवहार, कर्जसंबंधी बाबी आणि निधीच्या हालचालींचा तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












