
सावंतवाडी : वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कॉफर्ट मार्केटमधील दुकान गाळ्यांच्या भाडेवाढीसंदर्भात माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले. तसेच सावंतवाडी नगरपालिकेच्या रिक्त असलेल्या मुख्याधिकारीपदी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्या संदर्भात आग्रही मागणी केली.
सावंतवाडी मतदार संघातील वेंगुर्ला नगरपरिषदेच्या क्रॉफर्ट मार्केटमध्ये ४८ दुकान गाळे आहेत. या दुकान गाळ्यांमध्ये गेली अनेक वर्षे व्यापारी आपला व्यवसाय करत आहे. सध्याच्या ऑनलाईन खरेदी सुविधांमुळे स्थानिक व्यापारावर मोठा परिणाम झालेला आहे. तसेच बाहेरील फिरते व्यापारी येऊन गरजेच्या वस्तू परस्पर विक्री करुन जात असल्याने नगरपरिषदेच्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना गिऱ्हाईक उपलब्ध होत नाही. त्यामुळे याचा परिणाम मार्केटमधील दुकानांवर होऊन मार्केटमधील दुकानदारांची परिस्थिती बिकट झालेली आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेने ०१/०४/२०२६ पासून दुकान गाळयांची अनामत रक्कम दुप्पट करत गाळ्यांचे भाडेही दुप्पट केले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला भाडे देणे परवडत नसल्याचे दिसून येत आहे. तशी तक्रार संबंधित व्यापाऱ्यांनी माझ्याकडे केलेली आहे. मुख्याधिकारी, वेंगुर्ला नगरपरिषद यांनी संबंधित भाडेकरंना सुधारीत भाडेवाढ व अनामत रक्कम जमा करण्याची नोटीस दिलेली आहे. ही दरवाढ अन्यायकारक असल्याचे संबंधित व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे.
त्यामुळे या दरवाढीला आपल्या स्तरावरून तात्काळ स्थगिती देण्यात यावी. तसेच या विषयावर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने आपल्या स्तरावर संबंधित यंत्रणेतील घटक, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व इतर अधिकारी वर्गासमवेत आपल्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करावी व बैठकीला मलाही निमंत्रीत करावे अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी केली.












