LIVE UPDATES

जमिनीच्या वादातून भावाला बेदम मारहाण

बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल
Edited by: स्वप्नील लोके
Published on: June 09, 2026 20:06 PM
views 82  views

देवगड : कोटकामते-लिंगडाळवाडी येथे जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला लाकडी दांडका व लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बापलेकाविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटकामते-लिंगडाळवाडी येथील रवींद्र माधव खाजणवाडकर (वय ६०) यांचे चुलत भाऊ राकेश पुंडलिक खाजणवाडकर व त्यांचा मुलगा अमन राकेश खाजणवाडकर यांच्याशी जमिनीची मोजणी आणि मालकी हक्काच्या कारणावरून वाद सुरू आहे. ६ जून रोजी रात्री सुमारे १० वाजता रवींद्र खाजणवाडकर हे खेकडे शोधून घराकडे परतत असताना घरानजीकच्या पायवाटेवर संशयित राकेश आणि अमन यांनी त्यांना अडविले. यावेळी जमिनीच्या वादावरून दोघांनी शिवीगाळ करत लाकडी दांडका व लोखंडी रॉडने त्यांच्यावर हल्ला केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

या मारहाणीत रवींद्र खाजणवाडकर यांच्या डाव्या खांद्याला, दंडाला तसेच दोन्ही पायांना दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी रवींद्र खाजणवाडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राकेश पुंडलिक खाजणवाडकर व अमन राकेश खाजणवाडकर या दोघांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.