LIVE UPDATES

दशावतार कलेच्या संवर्धनासाठी शासन सकारात्मक !

कलाकारांच्या मागण्यांवर विभागीय समन्वय बैठकीचे निर्देश
Edited by: विनायक गांवस
Published on: June 10, 2026 21:19 PM
views 58  views

मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक 

मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून पात्र दशावतार कलापथकांना अनुदान दिले जाते. तसेच ज्येष्ठ कलावंत मानधन योजनेअंतर्गत दरमहा पाच हजार रुपयांचे मानधनही उपलब्ध आहे. मात्र, दशावतार नाट्यमंडळाच्या मागण्या ह्या विविध विभागांशी संबंधित असल्याने या मागण्यांबाबत मुख्य सचिवांच्या स्तरावर समन्वय बैठक घेण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी जाहीर केले. तसेच कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या दशावतार कलेच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असून दशावतार कलाकारांची अधिकृत निर्देशिका तयार करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली.

कोकणातील पारंपरिक दशावतार लोककलेच्या जतन, संवर्धन आणि कलाकारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज पु‌. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी येथे बैठक पार पडली. या बैठकीस आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर,  सिंधुदुर्ग अप्पर जिल्हाधिकारी सौ शुभांगी साठे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार मंडळांचे प्रतिनिधी सुधाकर दळवी, तुषार नाईक व सौरभ पाटकर, कलावंत आणि पदाधिकारी उपस्थित होते.


मंत्री ॲड.शेलार म्हणाले की,  कोकणातील दशावतार महोत्सवांची संख्या वाढवून मुंबई आणि ठाणे येथेही शासनाच्या माध्यमातून विशेष दशावतार महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दशावतार विषयक प्रशिक्षण कार्यशाळा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्थानिक संस्थांशी समन्वय साधण्याचे तसेच महाराष्ट्रातील लोककलांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याबाबत बालभारतीला पत्र पाठविण्याचे निर्देशही मंत्री ॲड.शेलार यांनी दिले.   तर कलाकारांच्या प्रवास सवलतीसाठी परिवहन विभागाशीही पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दशावतार कलाकारांच्या वाहनांवरील करसवलत, विश्रांतीगृहे, मुंबई-ठाणे परिसरात निवास व्यवस्था, तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी सांस्कृतिक भवन उभारणीच्या मागण्यांवरही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री शेलार यांनी यावेळी दिले.