
सावंतवाडी : जमिन सपाटीकरणाच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने माती उत्खनन केल्याबद्दल दांडेली ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करताना नियमांचे पालन न करता चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणची माती दुस-या ठिकाणी वाहतुक केली जात आहे. पहिल्याच पावसात ही माती रस्त्यावर आली असून अपघात होत आहेत. ग्रामस्थांच्या शेतीमध्ये माती जात आहे. त्यामुळे याची चौकशी करून दोषीवर दंडात्मक कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
ग्रामस्थ म्हणाले, यामुळे या भागातील पर्यावरणाची हानी होण्याची शक्यता असून ही जागा उंच डोंगराळ अशी आहे. त्या जागेच्या उत्खननामुळे आजूबाजूच्या शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवू शकते. तसेच पावसाळयामध्ये दरड कोसळू शकते. इतरत्र कोठेही वाहतुक केल्याचे दिसून येत नाही असा अहवाल सादर करून सपाटीकरणासाठी परवानगी देण्यात आली. परंतू, प्रत्यक्षात आम्ही ग्रामस्थांनी पाहणी केली असता डोंगर तोडून मोठ्या प्रमाणात वाहतुक केल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचे संबंधिताशी साटेलोटे तसेच आर्थिक गैरव्यवहार करून अशी परवानगी देण्यात आली आहे का ? अशा प्रकारची शंका आहे. प्रशासनाच्या आशीर्वादाने हा प्रकार झाला असून या प्रकरणाचा तपास आपल्या स्तरावरून पारदर्शकपणे व्हावा, गावाला पर्यावरणाच्या हानीपासून सुरक्षित ठेवावे. तसेच संबंधित व्यक्तींना जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई व्हावी. तसेच उत्खनन व माती चोरीबाबत चौकशी करून दोषींवर योग्यती कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.










