LIVE UPDATES

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक

सव्वा दोन लाख उकळले
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 10, 2026 21:22 PM
views 18  views

कणकवली : शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणीकडून व तिच्या वडिलांकडून तब्बल २ लाख २४ हजार ६५० रुपये उकळून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात श्रीकृष्ण शामसुंदर कुडतरकर (वय ५२, रा. तोंडवली कुडतरकरवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.   याबाबत कणकवलीतील त्या तरुणीने  पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 

ती तरुणी एम.कॉम. शिक्षित असून नोकरीच्या शोधात होती. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीमार्फत श्रीकृष्ण कुडतरकर यांची ओळख झाली. कुडतरकर यांनी आपण अँटी करप्शन विभागात कार्यरत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष अधिकारातून गोपनीय विभागातील वरिष्ठ लिपिक पदाच्या जागा भरल्या जाणार असल्याचे सांगितले. त्यासाठी दोन लाख रुपये खर्च येईल व नोकरी निश्चित मिळेल, असे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवून तिच्या  वडिलांनी २ ऑक्टोबर २०२५ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत विविध व्यवहारांद्वारे श्रीकृष्ण कुडतरकर यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण २ लाख २४ हजार ६५० रुपये जमा केले. मात्र, त्यानंतरही नोकरीबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. उलट पैसे परत मागितल्यानंतर कुडतरकर यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.अखेर पैसे परत देण्याबाबत झालेल्या चर्चेनंतरही कुडतरकर यांनी रक्कम परत करण्यास नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री त्या तरुणीच्या कुटूंबाला झाली. त्यानंतर त्यांनी कणकवली पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार, श्रीकृष्ण कुडतरकर यांनी स्वतःला अँटी करप्शन विभागातील अधिकारी असल्याचा बनाव करून शासकीय नोकरीचे आमिष दाखवत फिर्यादीकडून व त्यांच्या वडिलांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कणकवली पोलिस करीत आहेत.