
कणकवली : तालुक्यातील नडगिवे गावातील धुरीभाटले या वाडीतील तब्बल सहा बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली. घरफोडीच्या घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्या असल्या तरी चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून या घरफोड्या पहाटे २.४५ वा. सुमारास घडल्या आहेत. विशेष म्हणजे सीसीटीव्हीत चोरट्यांची टोळीच दिसून आली असून त्यात सहा चोरटे दिसत आहेत. दरम्यान घरफोडीतील घरांचे मालक बाहेरगावी असल्याने चोरीस गेलेला मुद्देमाल अद्याप समजू शकलेला नाही.
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नडगिवे या गावात शेर्पे - नडगिवे रस्त्यावर धुरीभाटलेवाडी आहे. वाडीत घरे मोठ्या संख्येने असून बहुतांश घरे बंद असतात. याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली आहे. चोरट्यांनी विशेषत: पक्क्या घरांना लक्ष्य केले. सेवानिवृत्त बीएसएनएल कर्मचारी मोहन सखाराम मण्यार, संदीप पांडूरंग मांजरेकर, भास्कर शंकर राणे, रविंद्र वासुदेव मांजरेकर, शंकर सीताराम आंबेरकर, अमोल सदाशिव मयेकर अशा सहा जाणांची घरे चोरट्यांनी फोडली.
पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील जितेंद्र मण्यार यांनी कणकवली पोलिसांना दिली. त्यानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तेजस नलवडे, खारेपाटण दूरक्षेत्राचे हवालदार मिलिांद देसाई आदी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञही मागविण्यात आले होते.
चोरट्यांचा घरांची कुलूपे फोडून प्रवेश
चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कुलूपे, कडीकोयंडे तोडून आत प्रवेश केल्याचे दिसून आले. अनेक घरांमध्ये कपाटे फोडण्यात आली होती. परिणामी घरातील कपडे व इतर साहित्य इतस्तत: पसरले होते.
चोरटे सीसीटीव्हीत कैद
धुरीभाटलेवाडी येथील बहुतांश ग्रामस्थ नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत असतात. परिणामी त्यांची गावाकडील घरे बंद असतात. याच कारणास्तव अनेकांनी घर, परिसरात सीसीटीव्ही लावले आहेत. याच सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. चोरटे तोंडाला रुमाल बांधून तसेच हातमोजे घालून आहेत. त्यांच्याकडे एक दुचारी असल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसले आहे.
परिसरात घबराहट
एकाच रात्रीत आणि एकाच वाडीतील तब्बल सहा घरे चोरट्यांनी फोडल्याने नडगिवे व खारेपाटण परिसरात घबराहट पसरली आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावावा, अशी मागणी नडगिवेचे उपसरपंच भावेश कर्ले, माजी सरपंच अमित मांजरेकर व ग्रामस्थांमधून होत आहे.










