
कणकवली : शहरातील उड्डाणपुलाखाली जागेत भाजी, फुले, फळ विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरुपात जागा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत परप्रांतिय विक्रेत्यांना जागा न देता स्थानिक विक्रेत्यांना जागा द्यावी. स्थानिकांना डावलून परप्रांतिय विक्रेत्यांना जागा दिल्यास भाजप युवा मोर्चाकडून सत्ताधारी व प्रशासनाच्याविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे कणकवली शहराध्यक्ष सागर राणे यांनी मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदन देतेवेळी नगरसेवक स्वप्निल राणे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संतोष पुजारे, चिटणीस गणेश तळगावकर, ऋतिक नलावडे, शहर उपाध्यक्ष मंदार सोगम, सरचिटणीस मुन्ना परब आदी उपस्थित होते.
निवेदन म्हटले आहे, नगरपंचायतीतर्फे शहरातील उड्डाणपुलाखालील जागेत भाजी व फळ विक्रेत्यांना स्थंलातरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत स्थानिक विक्रेत्यांवर अन्याय होत असल्याच्या गंभीर तक्रारी भाजप युवा मोर्चाकडे प्राप्त झाल्या आहेत.
नवीन जागेत स्थानिक मराठी भूमीपुत्रांनाच प्राधान्य दिले गेले पाहिजे. परप्रांतीयांना जागा देण्यास भाजप युवा मोर्चाचा सक्त विरोध आहे. स्थानिकांच्या हक्काच्या रोजगारावर डल्ला मारण्याचा प्रयत्न झाल्यास भाजप युवा मोर्चा तो खपवून घेणार नाही. या प्रक्रियेत सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांची मनमानी सुरू आहे. विक्रेते स्थंलातरिच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांच्या मोजक्या कार्यकर्त्यांना जागा वाटप केले जात आहे. हा स्थानिक विक्रेत्यांवर अन्याय आहे.
एकाच व्यक्तीला बहुसंख्य जागा देण्याची ही चुकीची पद्धत तत्काळ थांबवून स्थानिक विक्रेत्याला एकच जागा या न्यायाने वाटप झाले पाहिजे. नगरपंचायती प्रशासनाने राजकीय दबाव झुगारून पारदर्शक पद्धतीने आणि स्थानिकांच्या हिताचा विचार करूनच या जागांचे वाटप करावे. स्थानिक भूमीपुत्रांना डावलून परप्रांतीयांना किंवा सत्ताधारी कार्यकर्त्यांचे उदरभरण करण्याचा प्रयत्न झाला, तर भाजप युवा मोर्चाच्यावतीने नगरपंचायतीविरोधात 'स्थानिक हक्क आंदोलन' छेडण्यात येईल. त्यामुळे जागा वाटप विषयात आपण लक्ष घालून स्थानिक भूमीपुत्रांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.












