LIVE UPDATES

कणकवलीत 'लव्‍ह जिहाद'चा प्रकार उधळला

भाजप पदाधिकार्‍यांची पत्रकार परिषदेत माहिती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 01, 2026 20:07 PM
views 29  views

कणकवली : कणकवली शहरात लव्‍ह जिहादचा प्रकार घडण्‍याची शक्‍यता होती. मात्र, ही बाब भाजप कार्यकर्त्यांना समजताच त्‍यांनी धाव घेऊन हा प्रकार उधळून लावला. दोन्‍ही युवक – युवती कणकवली परिसरातीलच असल्‍याची माहिती भाजप पदाधिकार्‍यांनी येथील नारायण राणे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस भाजप शहराध्‍यक्ष अण्‍णा कोदे, नगरसेवक राकेश राणे, स्‍वप्‍नील राणे, नगरसेविका मेघा गांगण, मेघा सावंत, मनस्‍वी ठाणेकर, आर्या राणे, प्रतिक्षा सावंत आदी उपस्‍थित होते.

याबाबत माहिती देताना राकेश राणे म्‍हणाले, सदर मुस्‍लिम युवकाने फसवणुकीच्‍या इराद्‍याने २०१९ मध्‍ये हिंदू मुलीशी प्रेमसंबंध जुळवले. सदर मुलगी त्‍यावेळी अवघ्‍या १४ वर्षांची होती. ही मुलगी मुळची येथीलच असून मुंबईत वास्तव्यास असते. येत्‍या ३० ऑक्‍टोबरला ते ओरोस येथे रजिस्‍टर पद्‍धतीने लग्‍न करणार होते. मात्र, याबाबत मुलीच्‍या कुटुंबियांनी भाजप पदाधिकार्‍यांना माहिती दिली.

भाजप पदाधिकारी हे सदर युवक, युवती व त्‍यांच्‍या कुटुंबियांना ओरोस येथे भेटले. पदाधिकार्‍यांनी युवकास योग्‍य शब्‍दांमध्‍ये समज दिली. त्‍यानंतर लग्‍न न होण्‍याबाबत कायदेशीर प्रक्रिया करून घेण्‍यात आली. तर सदर मुलीने आपणास या युवकाशी लग्‍न करायचे नसल्‍याचे सांगितले. तर त्‍या युवकाने देखील आपण सदर मुलीशी लग्‍न करत नसल्‍याचे लेखी लिहून दिल्‍याची माहिती राकेश राणे यांनी दिली.

लव्‍ह जिहाद खपवून घेणार नाही

आमचे नेते पालकमंत्री नीतेश राणे हे लव्‍ह जिहादच्‍या विरोधात सदैव लढत आले आहेत. त्‍यामुळे आमच्‍या शहरात असे प्रकार होत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही राकेश राणे यांनी दिला.