LIVE UPDATES

वाभवेत भातपिकांच्या नुकसानीचे पंचनामे

नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांची उपस्थिती; शेतकऱ्यांशी साधला संवाद
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 01, 2026 19:52 PM
views 24  views

वैभववाडी : अनियमित पाऊस आणि दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका बसलेल्या वाभवे गावातील भातपिकांची कृषी विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात आले. या पाहणीदरम्यान नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भातशेतीही धोक्यात आली आहे. शासनाकडून दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कृषी अधिकारी नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. आज वाभवे गावातील पिकांचा पंचनामा करण्यात आला. 

सहायक कृषी अधिकारी विशाल मुळे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांनी बाधित भातशेतीची पाहणी केली. पावसातील अनियमिततेमुळे भातपिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून, अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. यावेळी शेतकऱ्यांनी पिकांचे झालेले नुकसान तसेच निर्माण झालेल्या अडचणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

श्रद्धा रावराणे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत व भरपाई मिळण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच पंचनाम्याची प्रक्रिया वस्तुनिष्ठ, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

पंचनाम्या दरम्यान बांधकाम सभापती रणजित तावडे तसेच गावातील बाधित शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहणी व पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ पातळीवर सादर करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.