
चिपळूण : निसर्ग, वन्यजीव आणि मानवी सहजीवनाचा अनोखा संगम साधणारा 'वाघबारस' हा सण ग्रामीण संस्कृतीतील एक समृद्ध परंपरा आहे. पशुधनाचे रक्षण करत निसर्गाशी जुळवून घेण्याची शिकवण देणारा हा दिवस तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर गुराखी आणि शेतकरी रानात जाऊन साजरा करतात. यंदा चिपळूण तालुक्यातील विविध भागांत येत्या २२ तारखेला वाघबारसचा हा पारंपरिक सोहळा रंगणार आहे.
फार पूर्वी पासून रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाघबारस शेतकरी आणि गुराखी रानात जाऊन पाण्याच्या ठिकाणी वाघबारस साजरी करतात. या दिवशी गुराखी आपल्या काठ्या स्वच्छ धुवून त्याचे एकत्रित पूजन करतात. रानात गुरे सांभाळताना याच काठ्या त्यांच्या साथीदार असतात. वाघबारस या दिवशी काठी पूजनाने त्यांचा आदर केला जातो.
प्रत्येक कुटुंबातून एक वाटी तांदूळ, काही पैसे गोळा केले जातात. याच तांदळातून देवाला नैवद्य बनवला जातो. वाघबारस या दिवशी काही मुलांना वाघ बनवले जाते. त्यांना आंघोळ घालून त्यांच्या शरीरावर रंगीत दगडाने अंगावर ठिपके काढले जातात. त्यानंतर काही ग्रामस्थ भोजन बनवत असतात.
पूर्ण तयारी झाल्यावर वाघ झालेली मुले जंगलातून धावतात आणि त्यांच्या मागून गुराखी त्यांना पळवून लावण्यासाठी धावत असतात. यावेळी वाघ आला रे...वाघ..अशा मोठ्याने आरोळ्या दिल्या जातात. पुन्हा सर्वजण मूळ ठिकाणी आल्यावर वाघ झालेली मुले आंघोळ करतात. त्यानंतर रानातच सामूहिक जेवण केले जाते. त्या आधी सर्व निसर्गातील देवाना वंदन करून नैवेद्य दाखवला जातो. दहाही दिशांना नैवद्य ठेवला जातो.
गेली अनेक वर्ष ग्रामीण भागात ही प्रथा सुरु आहे. निसर्गातील वन्यप्राणी आणि निसर्ग यांच्याशी शेतकरी व गुराखी यांचे असलेले नाते दृढ होत असते. हि परंपरा म्हणजे एक अतूट प्रेमाचे बंधन आहे. तुळशी विवाह या दिवशी अनेक गावातून ही वाघबारस आजही साजरी होताना दिसते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








