LIVE UPDATES

Sindhudurg Civil Defence Mock Drill : जिल्ह्यात २५ नोव्हेंबर रोजी नागरी संरक्षण मॉकड्रिल व ब्लॅकआउट सराव

ओरोस येथे सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सरावाचे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 20, 2026 07:36 PM
views 61  views

सिंधुदुर्गनगरी : ऑपरेशन सिंदूरदरम्यान मिळालेल्या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर समाजामध्ये आपत्कालीन परिस्थितीतील तोंड देण्याची सज्जता आणि प्रतिसादाची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. त्यानुसार केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सन २०२६ मध्ये वर्षातून दोन वेळा नागरी संरक्षण मॉकड्रिल (Civil Defence Exercise) व ब्लॅकआउट सराव आयोजित करण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी नागरी संरक्षण मॉकड्रिल व ब्लॅकआउट सराव आयोजित करण्यात येणार आहे.

या मॉकड्रिलमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग, नागरी संरक्षण स्वयंसेवक, एनसीसी (NCC), एनएसएस (NSS) स्वयंसेवक, पोलीस यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी व रुग्णवाहिका सेवा, होमगार्ड यंत्रणा, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक यांचा सहभाग राहणार आहे.

या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), ऑरोस यांच्या आवारामध्ये दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत सदर मॉकड्रिल व ब्लॅकआउट सराव घेण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी, विविध यंत्रणांचा समन्वय आणि आपत्ती व्यवस्थापनाची तयारी याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा सराव आयोजित करण्यात आला आहे.