LIVE UPDATES

कोल्हापूर–दोडामार्ग थेट एसटी सेवा सुरू

प्रवाशांना मोठा दिलासा : ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 20, 2026 07:31 PM
views 127  views

दोडामार्ग : कोल्हापूर ते दोडामार्ग एसटी बस फेरी सुरू व्हावी अशी प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी अखेर पूर्ण झाली असून शुक्रवार २० नोव्हेंबर रोजी कोल्हापूर आगाराची बस दुपारी एक वाजता दोडामार्ग येथे दाखल झाली. या नव्या बस फेरीचे कळणे, डबेवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. बसचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर प्रथम फेरीचे चालक व वाहक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. फटाक्यांच्या आतषबाजीने आणि जल्लोषात नव्या एसटी फेरीचे स्वागत करत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

कोल्हापूर ते दोडामार्ग ही एसटी बस फेरी सुरू व्हावी यासाठी कळणे येथील रहिवासी तथा सिंधुदुर्ग विभागातील प्रशिक्षित वाहक चंद्रकांत अनंत परब हे सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, ही बस फेरी सुरू झाल्याने दोडामार्ग तालुक्यातील प्रवाशांना कोल्हापूरला जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण वाहतूक सुविधा उपलब्ध झाली आहे. ही फेरी सुरू करण्यासाठी कोल्हापूर विभाग नियंत्रक प्रतीक शिंदे, अनिल मेहंतर व सागर पाटील या एसटी अधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

शुक्रवारी दुपारी कोल्हापूर आगाराची बस दोडामार्ग येथे दाखल होताच कळणे, डबेवाडी येथे ग्रामस्थांनी बसचे स्वागत केले. बसचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रथम फेरीचे चालक हिंदुरराव गोविंद सुतार व वाहक युवराज साविकर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करत ग्रामस्थांनी या नव्या वाहतूक सुविधेचे स्वागत केले.

यावेळी कळणे सरपंच अजित देसाई, सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, विठ्ठल नाईक, पुरुषोत्तम देसाई, भीमराव देसाई, चंद्रशेखर कळणेकर, सुनिता भिसे, विनायक देसाई, भिकाजी देसाई, गिरीश नार्वेकर, अजित घोडके, महेश नाईक, ब्रिजेश नाईक, दशरथ परब, संजय देसाई, मधुकर गावकर, सुनील नार्वेकर, गोविंद देसाई, आबा साळगावकर, सखाराम शिंदे, प्रताप देसाई, समीर गवस, राजन कळणेकर यांच्यासह अन्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर–दोडामार्ग ही एसटी बस फेरी... कोल्हापूर–आदमापूर–आजरा–आंबोली–सावंतवाडी–बांदा–दोडामार्ग या मार्गावर धावणार आहे. कोल्हापूर येथून सकाळी ६ वाजता बस दोडामार्गच्या दिशेने रवाना होणार असून, दुपारी १ वाजेपर्यंत दोडामार्ग येथे पोहोचणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता दोडामार्ग बसस्थानकातून ही बस पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने रवाना होणार आहे.

आजची बस फेरी प्रायोगिक (ट्रायल) तत्त्वावर घेण्यात आली. या फेरीमुळे दोडामार्ग तालुक्यातील प्रवाशांना कोल्हापूरकडे जाण्यासाठी अधिक सोयीचा पर्याय उपलब्ध होणार असून, विद्यार्थ्यांसह नोकरदार, व्यापारी व अन्य प्रवाशांना या बस सेवेचा लाभ होणार आहे. कोल्हापूर आणि दोडामार्गदरम्यान थेट बस सेवा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.