LIVE UPDATES

Sindhudurg Water Conservation : वनराई बंधारे टिकवण्यासाठी गाळ काढणे, पाण्याला मार्ग देणे गरजेचे

माधव भंडारी यांचे जलसंवादात प्रतिपादन : गाव तलावांचे पुनरुज्जीवन आणि शेतकऱ्यांना जलसाठ्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 20, 2026 07:26 PM
views 66  views
BJP leader Madhav Bhandari speaks about water conservation, check dams and village lake restoration at the Jal Samvad programme in Sindhudurg.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले असूनही पाणी टिकत नसल्याची समस्या आहे. यावर उपाय म्हणून केवळ बंधारे घालून चालणार नाही, तर नदी, नाले, ओढे आणि गाव तलावांची पाणी साठवण क्षमता वाढवणे, गाळ काढणे, पाण्याला योग्य मार्ग करून देणे आणि जलसंधारणाच्या कामांची नियमित देखभाल करणे आवश्यक आहे. वनराई बंधाऱ्यांची चळवळ योग्य वेळी सुरू झाली असून, ती दीर्घकाळ टिकवण्यासाठी तांत्रिक बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक, सिंधू आत्मनिर्भर अभियान आणि भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जलसंवाद – उदक चालवावे युक्ती’ कार्यक्रमात ते बोलत होते. जलव्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ रमेश पांडव यांच्या पुस्तिकेतील मार्गदर्शन उपयुक्त असून, मराठवाड्यातील दुष्काळी भागात त्यांनी केलेल्या प्रयोगांचा अनुभव सिंधुदुर्गसाठीही महत्त्वाचा ठरू शकतो, असे भंडारी म्हणाले.

पूर्वी जिल्ह्यात कच्चे बंधारे घालण्याची परंपरा होती. मात्र, ही कामे बंद झाल्यानंतर विहिरी कोरड्या पडण्याचे प्रमाण वाढल्याचे जुन्या अधिकाऱ्यांकडून समजले. त्यानंतर लोकसहभागातून कच्चे बंधारे उभारण्याचा उपक्रम सुरू करून त्याला ‘अटल बंधारे’ नाव देण्यात आले.

भाजपने सुरुवातीला शंभर बंधारे घालण्याचे उद्दिष्ट ठेवले. त्याला प्रतिसाद देत अन्य राजकीय पक्षांनीही सहभाग घेतल्याने जिल्ह्यात जवळपास बाराशे कच्चे बंधारे उभारले गेले. या उपक्रमाचा परिणाम म्हणून पुढील वर्षी जिल्हा टँकरमुक्त झाला आणि त्यानंतर अनेक वर्षे जिल्ह्याला टँकरची फारशी गरज भासली नाही, अशी आठवण भंडारी यांनी सांगितली.

वनराई बंधाऱ्यांची सध्याची चळवळ अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त असून, पालकमंत्री नितेश राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या या अभियानाचे त्यांनी अभिनंदन केले. मात्र, बंधारे उभारताना जमिनीचा पोत, नदीपात्रातील साचलेला गाळ आणि पाण्याची मूळ पातळी यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

अनेक ठिकाणी गाळ साचल्यामुळे पात्र उथळ झाले आहे. अशा ठिकाणी बंधारे बांधले तरी पाणी साठत नाही. पूर्वी काही ठिकाणी २० फूट गाळ काढल्यानंतरच बंधारे प्रभावी ठरल्याचा अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले.

बंधाऱ्यांमधील पाण्याचा भूजल पातळीवर परिणाम साधारण सहा किलोमीटर परिसरापर्यंत होऊ शकतो, असे सांगून भंडारी यांनी जलसंधारणाच्या कामांची क्षमता अधोरेखित केली. मात्र, बंधाऱ्यांचा पाया मजबूत नसल्यास पाणी खालून झिरपून निघून जाते. तसेच पहिल्या पावसात बंधारे वाहून जाण्यापासून वाचवण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाला योग्य मार्ग करून देणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी किंवा पहिला पाऊस झाल्यानंतर बंधाऱ्यातील पाण्याचा निचरा व्यवस्थित केला नाही, तर गाळ पुन्हा साचून जलसाठ्याची क्षमता कमी होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्ह्यात जवळपास साडेतीनशे ते चारशे गाव तलाव असून, त्यातील सुमारे ९० टक्के तलाव मानवनिर्मित आहेत. सध्या अनेक तलाव कोरडे पडत असल्याने त्यांच्या पुनरुज्जीवनाची संधी उपलब्ध झाली आहे. विशेष निधीची तरतूद करून तलावांमधील गाळ काढण्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम हाती घेतल्यास तलावांची पाणी साठवण क्षमता वाढेल. काढलेली माती शेतकरी व बागायतदारांना दिल्यास शेतीसाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. तलावांचे पुनरुज्जीवन केल्यास त्यांचा वापर पुढील ५० ते १०० वर्षे करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुंकेश्वर परिसरातील ‘सुकतळ’ तलावाचे उदाहरण देताना, गाळ काढून उपसा केल्यानंतर त्यात जिवंत झरे सापडले आणि आता त्या तलावात बाराही महिने पाणी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रयोगांची जिल्ह्यात पुनरावृत्ती होऊ शकते.

शेतकऱ्यांनाही स्वतःच्या शेतात पाणी साठवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आणि आर्थिक तरतुदी करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या स्वतःच्या जलसाठ्यामुळे त्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होईल. सिंधुदुर्ग जिल्हा राखीव वनक्षेत्राच्या निकषांमध्ये येत असल्याने जलसंधारणासाठी आवश्यक निधी व तरतुदी मिळवण्याची संधीही आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘पाणी ही परमेश्वराची देणगी असली, तरी ती सांभाळण्यासाठी युक्ती, नियोजन आणि प्रयत्न आवश्यक आहेत. पाणी साठवणे, जतन करणे, त्याचा योग्य वापर करणे आणि जलस्रोत वाढवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसहभागातून विकासकामे करण्याची परंपरा आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन जलसंधारणाची चळवळ पुढे नेली पाहिजे,’ असे आवाहन भंडारी यांनी केले.