
देवगड : लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने देवगड तालुक्यातील मिठबाव येथे भंडारवाडी परिसरातील ओहळावर वनराई बंधारे उभारण्यात आले. या उपक्रमात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ग्रामस्थांसोबत प्रत्यक्ष श्रमदान करून सहभाग नोंदविला. प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, ग्रामस्थ, शेतकरी, महिला बचत गट तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केल्याने जलसंधारणाच्या या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले.
भंडारवाडी येथील ओहळावर तीन ठिकाणी वनराई बंधारे उभारण्यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे श्रमदान केले. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन करणे तसेच परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने या बंधाऱ्यांचे महत्त्व आहे. स्थानिक पातळीवर लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या अशा जलसंधारणाच्या कामांमुळे पाण्याचे संवर्धन करण्यास मदत होणार आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार शीतल जाधव, गट विकास अधिकारी निलेश जगताप, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह पंचायत समिती उपसभापती अमोल लोके, जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर, जिल्हा परिषद सदस्य सावी लोके, शैलेश लोके, केंद्रप्रमुख शिंदे, तालुका कृषी अधिकारी आरती पाटील, दिगंबर खराडे, तसेच गावपातळीवरील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमात रामेश्वर हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी, अध्यापक विद्यालय मिठबाव तसेच केळकर कॉलेज, देवगडच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष श्रमदानातून जलसंधारणाचे महत्त्व अनुभवले. जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीतून जनजागृती घडवून आणण्याच्या दृष्टीने हा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला.
महिला बचत गट, शेतकरी आणि ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गावातील पाण्याची गरज आणि भविष्यातील जलसुरक्षा लक्षात घेऊन नागरिकांनी प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावत श्रमदान केले. त्यामुळे जलसंधारण ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून त्यासाठी समाजाचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
जलसंधारणासाठी केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता गावागावातील नागरिकांनी स्थानिक पातळीवर पुढाकार घेऊन जलस्रोतांचे संवर्धन करण्याची गरज आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या लोकसहभागी उपक्रमांमुळे जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे आणि व्यापक प्रमाणावर राबविता येणार आहेत. मिठबाव येथील वनराई बंधाऱ्यांचा उपक्रम याच सामूहिक प्रयत्नांचे उदाहरण ठरला.













