
सिंधुदुर्गनगरी : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृषी समितीची महत्त्वाची सभा असतानाही राज्य कृषी विभागाच्या अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे गैरहजर राहिल्याने उपाध्यक्ष तथा सभाध्यक्ष दादा साईल यांनी सभागृहातूनच त्यांना दूरध्वनीवरून खडेबोल सुनावले. शेती नुकसानीच्या पंचनाम्यांना होत असलेला विलंब आणि गेल्या काही सभांनाही त्यांची अनुपस्थिती याबाबत साईल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषद कृषी समितीची सभा गुरुवारी (८ ऑक्टोबर) छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उपाध्यक्ष दादा साईल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समिती सचिव तथा जिल्हा कृषी विकास अधिकारी दीक्षांत कोळप, सदस्य संदीप गावडे, विजय नाईक, सुजाता पडवळ, पार्वती गवस, सुयोगी घाडी, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.
झाडे लावण्यापेक्षा जगविण्यावर भर
राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, जिल्हा व ग्रामीण मार्गांच्या बाजूला लावण्यात आलेल्या झाडांची माहिती समितीने मागविली होती. मात्र, बांधकाम विभागाने मागील सभेत मागितलेल्या माहितीसंदर्भात काही दिवसांपूर्वी तालुकास्तरीय कार्यालयांना सूचना दिल्याचे सांगितल्याने सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. बांधकाम विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाने नवीन झाडे लावण्यापेक्षा यापूर्वी लावलेली झाडे जगवावीत, अशा सूचना साईल यांनी दिल्या.
भाजीपाला किटऐवजी कडधान्य बियाणे
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भाजीपाला किट देण्याच्या योजनेत बदल करून कमी पाण्यावर तयार होणाऱ्या कडधान्यांचे बियाणे देण्याबाबत चर्चा झाली. कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठाशी चर्चा करून योग्य बियाण्यांची निवड करण्याचे निश्चित करण्यात आले.
कागदावर बंधारे नकोत!
कृषी व पशुसंवर्धन विभागाला स्वतंत्ररीत्या बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांची आपण स्वतः प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे साईल यांनी सांगितले. बंधारा केवळ कागदोपत्री दाखविलेला नसावा, तसेच त्यात पुरेसे पाणी असले पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. कृषी विभागाच्या पुनर्रचित अंदाजपत्रकातील काही योजनांचा निधी कमी करून अन्य योजनांसाठी वाढीव निधीची तरतूद करण्याच्या प्रस्तावास सभेने मान्यता दिली.











