LIVE UPDATES

विलास साळसकरांनी करावे आत्मपरीक्षण : अमोल लोके

पराभवाचे खापर नितेश राणेंवर फोडू नये
Edited by: स्वप्नील लोके
Published on: June 02, 2026 20:17 PM
views 20  views

देवगड : विलास साळसकर यांनी पत्रकार परिषद घेत भाजप-शिवसेना युती असताना पालकमंत्री नितेश राणे यांनी युतीधर्म पाळला नसल्याचा आरोप केला होता. मात्र, त्या मताशी आपण सहमत नसल्याचे स्पष्ट करत देवगड पंचायत समितीचे उपसभापती तथा शिवसेना तालुकाप्रमुख अमोल लोके यांनी साळसकर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

अमोल लोके म्हणाले की, शिंदे शिवसेना पक्षाचे त्या काळात फारसे राजकीय वजन नव्हते. तरीदेखील पक्षाचे दोन पंचायत समिती सदस्य निवडून आले. हे कसे शक्य झाले, याचा विचार करणे गरजेचे आहे. भाजप आणि शिवसेना यांची महायुती असल्याने भाजपने युतीधर्म प्रामाणिकपणे पाळला आणि त्याचाच परिणाम म्हणून तीनपैकी दोन सदस्य विजयी झाले.

आज मी पंचायत समितीच्या उपसभापती पदावर कार्यरत आहे. हा सर्व पालकमंत्री नितेश राणे यांचाच करिष्मा असल्याचेही त्यांनी नमूद केले. पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही मी हा विजय पालकमंत्री नितेश राणे यांचाच असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. कारण माझा पक्ष नवीन असल्याने पक्षसंघटना देखील पूर्णपणे सक्षम नव्हती. तरीही शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि आमदार निलेश राणे यांनी संधी दिली. त्या संधीचे सोने करण्याची किमया पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वामुळेच शक्य झाली, असे लोके यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आम्ही निवडणुकीत तीन उमेदवार होतो. त्यामध्ये केवळ विलास साळसकर यांचाच पराभव का झाला, याचे आत्मपरीक्षण त्यांनी स्वतः केले पाहिजे. आपल्या पराभवाचे खापर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे किंवा इतर मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांवर फोडणे योग्य नाही.

पालकमंत्री नितेश राणे यांचे जिल्ह्यातील काम समाधानकारक असून विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी आपली छाप पाडली आहे. वरिष्ठ पातळीवर महायुती कायम असून मित्रपक्षाने युतीधर्म पाळला नाही, अशा प्रकारची विधाने करून राजकीय वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करू नये, असेही अमोल लोके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.