LIVE UPDATES

आडाळी MIDCतील भूखंड वाटपावर स्थगिती

तातडीने स्थगिती उठविण्याची मागणी
Edited by: लवू परब
Published on: June 02, 2026 15:36 PM
views 48  views

कृती समितीचा उपोषणाचा इशारा 

दोडामार्ग :  आडाळी औद्योगिक क्षेत्रात उद्योग येण्यासाठी अनेक भूखंडधारकांनी भूखंड खरेदी केले. पण संबंधित अधिकारी यांनी भूखंड वाटप स्थगिती लावली. यामुळे भूखंड घेणारे घेऊ शकत नाही ही स्थगिती तातडीने उठवली नाही तर आडाळी विकास कृती समितीच्यावतीने उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे कृती समितीने दिला आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की औद्योगिक विकास महामंडळचा उद्योग उभारणी संबंधीचा अत्यंत बेजबाबदार, नकारात्मक व प्रतिगामी दृष्टीकोनाचा आम्ही आडाळी ग्रामस्थ सध्या अनुभव घेत आहोत. जेव्हा कोकणात प्रस्तावित असलेल्या तथाकथित विकास प्रकल्पाना स्थानिक जनता विविध मुद्यावरून विरोध करत होती, त्या काळात सन २०१३ मध्ये आम्ही स्वतःहून आडाळी औद्योगिक क्षेत्राचा प्रस्ताव तत्कालीन उद्योगमंत्री मान. नारायण राणे यांच्याकडे दिला. त्यांनी देखील अवघ्या आठ महिन्यात सुमारे ७०० एकर क्षेत्रात प्रकल्पला मंजूरी दिली. पुढच्या वर्षभरात आम्ही ७६%  पेक्षा अधिक क्षेत्र महामंडळाकडे हस्तांतरित केले. येथील क्षेत्रात पायाभूत सुविधा विकासासाठी व उद्योग येण्यासाठी आम्ही ग्रामस्थांनी आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करत आहोत. आमच्या सकारात्मक दृष्टिकोन व समन्व्यक भूमिकेमुळे महामंडळाला पायाभूत विकासासाठी नेहमी कृतिशील सहकार्य केले. २०२२ पासून उद्योगासाठी भूखंड विक्री सुरु व्हावी म्हणून आंदोलन केली. येथील औद्योगिक क्षेत्राची माहिती उद्योजकांना व्हावी व उद्योग आडाळीत यावेत म्हणून अनेक उपक्रम केले. गेल्या तीन वर्षातील कृती समितीच्या अथक प्रयत्नमुळे आज सुमारे ४५ हून अधिक उद्योजकांनी आडाळीत भूखंड खरेदी केले. उद्योजकांचा आडाळीकडे असलेला ओढा पहाता येथील औद्योगिक विकासाला चालना मिळेल असा आशावाद निर्माण झाला. 

महोदय, आपल्याला सांगण्यास खेद वाटतो कि, ऑक्टोबर २०२५ मध्ये येथील भूखंड वाटप प्रक्रिया अचानक स्थगित करण्यात आली. येथील तब्बल ४५ उद्योजकांनी ऑगस्ट २०२४ मध्ये म्हणजेच तब्बल वीस महिन्यापूर्वीपासून  महामंडळकडे भूखंडाची मोबदला रक्कम जमा केलेली आहे, मात्र आजपर्यंत काही उद्योजकांना भूखंड ताब्यात दिलेले नाहीत. तर काहींचे करार, बांधकाम परवाने थांबविण्यात आलेले आहेत. गेल्या आठ महिन्यामपासून सर्वं प्रशासकीय प्रक्रिया स्थगित आहे. उद्योजकांना कोणतीही लेखी कल्पना त्याबाबतीत दिलेली नाही. वारंवार मागणी करून देखील प्रक्रिया सुरु केली जात नाही. त्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र संतापाची भावना असून महामंडळ व आडाळी औद्योगिक क्षेत्राबाबत नकारात्मक भावना निर्माण होत असून ही गोष्ट येथील औद्योगिक विकासाला खीळ घालणारी आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुमारे ४५ हून अधिक उद्योजकांचे कोट्यावधी ची गुंतवणूक अडकवून ठेवण्यात आल्याने उद्योजक हवालदिल झाले आहेत. शिवाय अनेक उद्योजक आजही आडाळीत येण्यासाठी इच्छुक असून महामंडळच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे आडाळी क्षेत्राचा बॅट्याबोळ झालेला आहे. 

महोदय, आम्ही ग्रामस्थांनी मोठ्या विश्वसाने व अपेक्षेने या प्रकल्पसाठी जमिनी दिल्या. त्यानंतर देखील आम्ही सतत पाठपुरावा केला, प्रत्यक्ष कृतिशील सहकार्य केले. एक यशस्वी औद्योगिक क्षेत्र विकासासाठी आमचे प्रयत्न असताना देखील केवळ महामंडळ व लोकप्रतिनिधी यांच्या अनास्थेमुळे येथील औद्योगिक विकासाचा खेळखंडोबा सुरु आहे. येथे गुंतवणूक केलेल्या उद्योजकांना आर्थिक अडचणीत आणून महामंडळ व शासनाने स्वतःच्या उद्योगस्नेही या प्रचारकी प्रतिमेला कलंक लावला आहे. याचा जाहीर निषेध करून आम्ही उद्योजकांना न्याय मिळवून देण्यासाठी २२ जून २०२६ पासून आमरण उपोषण करणार आहोत. 

औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक केलेल्या उद्योजकांना आर्थिक अडचणीत आणून त्यांना उद्योग उभारणीपासून परावृत्त करण्याची महामंडळची मानसिकता उद्योजकांचे मानसिक खच्चीकरण करणारे आहे. अपेक्षा आहे कि आपण या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ स्थगित केलेली प्रक्रिया सुरु करून उद्योजकांना दिलासा द्याल. अन्यथा आम्हा ग्रामस्थांना नाईलाजाने पश्चाताप आंदोलन उभारावे लागेल, असे म्हटले आहे.