LIVE UPDATES

आर. जे. पवार यांच्यासोबत सर्वात कमी काळ काम करण्याची संधी मिळाली : जिल्हाधिकारी

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 02, 2026 21:03 PM
views 51  views

कणकवली : कोणतीही अडचण आली तरी त्या परिस्थितीला शांतपणे हसत सामोरे कसे जायचे हे पवार यांच्या कडून शिकले पाहिजे. काहीवेळा वरिष्ठ अधिकारी म्हणून मीही त्यांच्यावर रागवली आहे. मात्र त्यांनी त्या गोष्टीचे वाईट न वाटून घेता आपले काम १०० टक्के पूर्ण करायचे. आर. जे. पवार यांनी आपल्या कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांभाळून घेतले आहे. त्यामुळे त्यांनाही वाटत असेल की आपला कुटुंबप्रमुख सोडून जात आहे, अशी भावना असेल. एक धडाडीचा तहसीलदार आपल्यासोबत काम करायला नसणार याचे आम्हाला नुकसान आहे. मात्र त्याच्या ज्ञानाचा, अनुभवाचा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आम्हाला साथ मिळेल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केली. कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे देवगड तहसीलदार आर. जे. पवार यांचा सेवानिवृत्तीपर नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी देवगड तहसीलदार आर. जे. पवार, नगराध्यक्ष संदेश पारकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दिक्षांत देशपांडे, श्री. ओतारी, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, साहितीक प्रा. प्रदीप ढवळ, ओएसडी शशिकांत शिंदे, सौ. मीरा पवार आदी उपस्थित होते.

तृप्ती धोडमिसे म्हणाले, माझी प्रशासकिय सुरूवात नंदरुबार जिल्ह्यातून झाली असल्याने त्यांची आणि माझी पहिली ओळख झाली. त्या भागात ३ वर्ष काम केले आहे, त्यामुळे मला त्या भागातील प्रतिकुल परिस्थितीची जाणीव आहे. आजही त्या भागातील आदिवासी पाड्यामधील अनेक प्रश्न मार्गी लागले नाही आहेत. ४० ते ५० वर्षा पूर्वी तशा परिस्थितीत शिक्षण घेऊन पुढे येऊन इथ पर्यंत पोहचणे सोपी गोष्ट नाही. ज्या जिल्ह्याची बोली भाषा, संस्कृती पुर्णपणे वेगळी असता त्या जिल्ह्यात येऊन काम करून आदर्श निर्माण करणे हे नकिच कौतुकास्पद आहे. वयोमानानुसार नविन तंत्रज्ञान शिकणे थोडे कठीण जाते. मात्र आर. जे. पवार यांनी कोणतही नविन तंत्रज्ञान आल्यावर ते आपल्याला येत नाही म्हणून सोडले नाही.

ते तंत्रज्ञान शिकून त्यात पारंगत झाले आहेत. त्याच्यात असलेली कामाची तळमळ शिकण्यासारखी आहे. संदेश पारकर म्हणाले, माझा एक कार्यकर्ता एका कामासाठी वर्षभर फिरत होता. मी त्याला पवार साहेबांना भेटायला सांगितले आणि साहेबांनी आपल्या

प्रशासकीय अभ्यासाच्या बळावर ते काम अवघ्या आठ दिवसांत मार्गी लावून दाखवले. हीच त्यांची खरी ताकद आहे. पवार साहेब केवळ शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत, त्यांच्या सामाजिक कार्याची ही तर नवी सुरुवात आहे. 'टायगर अभी जिंदा है' या उक्तीप्रमाणे त्यांनी पुढेही याच धडाडीने काम करत राहावे. ते निवृत्तीनंतर कुठल्या पक्षात जातात किंवा काय करतात हा विषय महत्त्वाचा नाही, पण त्यांच्यासारख्या अनुभवी आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्वाची सिंधुदुर्गवासीयांना नितांत गरज आहे. त्यांनी जिल्ह्यातच राहून सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करावे.

मच्छिंद्र सुकटे म्हणाले, मी साहेबांना तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार ते तहसीलदार अशा सर्व टप्प्यांवर जवळून पाहिले आहे. हस्तलिखित सातबाऱ्यापासून ते ऑनलाईन सातबाऱ्यापर्यंतच्या सर्व तांत्रिक बाबींचा पवार साहेबांना सखोल अभ्यास आहे. १ मेला देवगड सब-डिव्हिजनच्या वेळी आमची आणि जिल्हाधिकारी मॅडमची अशी इच्छा होती की, पवार साहेबांना 'प्रांत अधिकारी' म्हणून पदोन्नती देऊन निवृत्त करायचे. अशा वरिष्ठ माणसाला हा मान मिळावा, असा आमचा मानस होता. मात्र ते होऊ शकले नाही. आर. जे. पवार यांनी आपल्या कारकिर्दीत आदर्श असे काम केले आहे.

जगदीश कातकर म्हणाले, सुरुवातीच्या काळात त्यांनी माझ्या हाताखाली काम केले, तर नंतरच्या काळात आम्ही खांद्याला खांदा लावून एकत्र काम केले. आर. जे. हे केवळ कर्तव्यदक्ष प्रशासक नसून एक उत्तम माणूस आहेत. नैसर्गिक आपत्ती असो की सर्वसामान्यांच्या अडचणी, शासनाच्या योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याची ३६ वर्षे अविरत सेवा केली आहे. सेवानिवृत्तीच्या अगोदर माणसाचा पगार पूर्ण असतो, पण माणूस कुटुंबाला अर्थाच मिळतो. आता निवृत्तीनंतर पगार अर्धा होईल, पण माणूस मात्र पूर्णपणे कुटुंबासाठी उपलब्ध असेल. त्यामुळे आता आर. जे. यांनी स्वतःचे छंद जोपासावेत आणि आरोग्याकडे लक्ष द्यावे.

सत्काराला उत्तर देताना आर. जे. पवार यांनी आपल्या बलपणापासून तलाठी ते तहसीलदार पदापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. आर. जे. पवार म्हणाले, ऑफिस मधील रचना आणि ऑफिस समोरील वातावरण चांगले असावे. ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे विचार चांगले नसतात मात्र येथील चांगले वातावरण पाहूण त्यांचे विचार आपणच बदलतील असे असावे. माझ्या कारकिर्दीत अनेकांची चांगली साथ मिळाली. त्यात माझ्या कुटुंबासह मित्रपरिवारांच मोठा वाटा आहे. १९९६-९७ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा १०० टक्के साक्षर जिल्हा म्हणून घोषित झाला. अशा साक्षर व सुशिक्षीत जिल्ह्यात अशिक्षीत माणसाला काम करण्याची संधी मिळाल्याने माझे जिवण सार्थक झाले असे मी मानतो. जिल्ह्यातील नागरिकांनी मला दिलेले प्रेम हे माझ्यासाठी अनमोल ठेवा आहे. ने मी कधीही विसरणार नाही, असे आर. जे. पवार म्हणाले.

'आर. जे.' नावाने परिचीत असलेले पवार साहेब अत्यंत शांत आणि मितभाषी आहेत. देवगडमधूनच त्यांच्या शासकीय सेवेची सुरुवात झाली आणि देवगडमध्येच ते सेवानिवृत्त होत आहेत, हा एक अनोखा योग आहे. त्यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीने कमावलेली माणसांची संपत्ती आजच्या सोहळ्यात दिसून आली. ज्यांची ज्यांची कामे साहेबांनी केली, ते सर्वजण आज कृतज्ञतेने त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.