LIVE UPDATES

कणकुंबी ते सोनुर्ली | कोकणच्या पर्यावरण संरक्षणासाठी ‘राखणदार' पदयात्रा

Edited by: भगवान शेलटे
Published on: June 02, 2026 20:47 PM
views 35  views

सिंधुदुर्ग : कोकणातील जल, जंगल, जमीन आणि स्थानिक पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘राखणदार संघा’तर्फे १३ जूनपासून ‘राखणदार पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेच्या पहिल्या टप्प्यात सहभागी होण्यासाठी निसर्गप्रेमी, तरुण आणि कोकणप्रेमींना आवाहन करण्यात आले आहे.

पदयात्रेचा पहिला टप्पा गोवा–कर्नाटक–महाराष्ट्र सीमेवरील कणकुंबी येथून सुरू होणार असून, गोवा–दोडामार्ग सीमावर्ती भागातून तेरेखोल नदी खोऱ्यात प्रवेश करत सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली माऊली मंदिर येथे समाप्त होणार आहे.

यात्रेदरम्यान विविध गावांना भेटी देत कोकणच्या निसर्गपूजक परंपरा, सातेरी–राखणदार संस्कृती, पवित्र देवराया आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच जल, जंगल, जमीन आणि जीवन यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करत स्थानिक समुदायांशी संवाद साधला जाणार आहे.

विशेषतः तरुण पिढीला पर्यावरणीय प्रश्नांची जाणीव करून देणे, कोकणसमोरील वाढत्या पर्यावरणीय आव्हानांवर चर्चा घडवून आणणे आणि सामुदायिक उपाययोजनांबाबत विचारमंथन करणे हा या यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. ही पदयात्रा केवळ जनजागृती मोहीम नसून, कोकणच्या नैसर्गिक वारशाशी आणि सांस्कृतिक परंपरांशी पुन्हा नाते जोडण्याचा सामूहिक प्रयत्न असल्याचे राखणदार संघाने स्पष्ट केले आहे.

या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 70588 26674 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.