
- यंदाचा गणेशोत्सवातील प्रवास खडतरच ?
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एप्रिल महिन्यात सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात दिले होते. मंत्र्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदारांनी ३१ मे पूर्वी काम पूर्ण करण्यासाठी हवा निर्माण केली. मात्र, ३१ मे उजाडला तरी महामार्गाचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सवातील प्रवास खडतरच होणार आहे.
सध्या चिपळूण पूल, संगमेश्वर पूल, निवळी पूल, पाली पूल आणि लांजा येथील पुलाचे काम अपूर्णच असल्यामुळे तेथील लोकांची गैरसोय निश्वित आहे. सिंधुदुर्गातील त्या कार्यक्रमानंतर अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी महामार्गाच्या कामाची पाहणी करून "आम्ही वेळेत काम पूर्ण करू" अशा घोषणा केल्या होत्या. मात्र, ठेकेदारांनी आपल्या कामाची 'कासवगती कायम ठेवत प्रशासनाला आणि जनतेला तोंडघशी पाडले आहे.
चिपळूण, संगमेश्वर, निवळी, पाली आणि लांजा येथील उड्डाणपुलांची कामे अजूनही अपूर्ण आहेत. संगमेश्वर तालुक्यात आरवली ते वावनदी परिसरात चार ठिकाणी रस्त्याची कामे रखडलेली आहेत, तर लांजा तालुक्यातील वेरळ परिसरातील काम संथ गतीने सुरू आहे. संगमेश्वर बसस्थानकासमोरील पुलावरून १५ जूनपर्यंत एकदिशा मार्ग सुरू करू, असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिले आहे. मात्र, त्यापूर्वी पावसाचा जोर राहिला, तर वाहतूक कोंडीचा त्रास संगमेश्वरवासीयांना सहन करावा लागणार आहे.
३१ मे पर्यंत कामे पूर्ण करण्याची डेडलाईन पुन्हा चुकल्यामुळे पावसाळ्यात महामार्गावर ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण होण्याची भीती आहे, ज्यामुळे वाहनचालकांची डोकेदुखी वाढणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्यातील गणेशोत्सवात मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या वाट्याला यंदाही खडतर आणि त्रासदायक प्रवासच येण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण, पाली लांजा येथील पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. निवळीतील पुलाचे काम झाले आहे. संगमेश्वर मधील पुलाचे कामही झाले आहे. त्यावरून वाहतूक सुरू करण्यासाठी पुढील आठ दिवस लागतील. महिन्याभरात ही राहिलेली कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे असे राजेंद्र कुलकर्णी, उप अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी सांगितले .
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी महामार्गाच्या कामाविषयी दिलेली आश्वासने सोडून द्यायची असतात. हे महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखवून दिले आहे. तीनवेळा मुदतवाढ देऊन ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत प्रशासनाने दाखवली पाहिजे असे शौकत मुकादम, माजी सभापती, चिपळूणयांनी म्हटले आहे .











