LIVE UPDATES

सावंतवाडीत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

३१ वर्षीय युवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
Edited by: विनायाक गांवस
Published on: June 02, 2026 11:31 AM
views 886  views

सावंतवाडी : लग्नाचे आमिष दाखवून एका २७ वर्षीय तरुणीवर गेल्या ७-८ वर्षांत वारंवार अत्याचार करून, ऐनवेळी लग्न करण्यास नकार देत फसवणूक केल्याची धक्कादायक घटना सावंतवाडीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात एका ३१ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 

ही कारवाई १ जून २०२६ रात्री उशिरा करण्यात आली. संशयित ३१ वर्षीय युवकाने पीडित २७ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पाडून त्याने तरुणीशी प्रेमसंबंध जोडले आणि गेल्या ७ ते ८ वर्षांच्या कालावधीत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र, जेव्हा लग्नाची वेळ आली, तेव्हा युवकाने ऐनवेळी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तरुणीच्या तक्रारीवरून काल रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपीला तातडीने ताब्यात घेण्यात आले आहे. याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती माधुरी मुळीक करत आहेत.