LIVE UPDATES

सिंधुदुर्गनगरीत वजराट सरपंच, ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

स्ट्रीट लाईटच्या माहितीसाठी प्रशासनाचे वेधले लक्ष
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 24, 2026 15:12 PM
views 131  views
#kokansadlive#news update#konkan update#

वेंगुर्ला: महावितरण प्रशासनाच्या कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि वजराट गावातील स्ट्रीट लाईटच्या देखभाल-दुरुस्तीबाबतची माहिती त्वरित मिळावी यासाठी आज सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ग्रामपंचायत वजराट व ग्रामस्थांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

  ​या उपोषणात सरपंच अनन्या आनंद पुराणिक, उपसरपंच दीपिका दिनकर राणे, ग्रामपंचायत सदस्य प्रियांका साईप्रसाद केरकर, प्रियांका रविंद्र मेस्त्री, आणि शामसुंदर भास्कर पेडणेकर यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

​गेल्या काही दिवसांपासून वजराट गावातील स्ट्रीट लाईटच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामावरून संभ्रम निर्माण झाला होता. या कामाची व जबाबदारीची लेखी माहिती देण्यासाठी ग्रामपंचायतीने महावितरणला यापूर्वीच मागणी केली होती. मात्र, अनेक स्मरणपत्रे देऊन आणि अगदी १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण करूनही प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. महावितरण अधिकाऱ्यांनी दिलेल्या सात दिवसांच्या आश्वासनाची मुदत संपूनही माहिती न मिळाल्याने, ग्रामस्थांना आज पुन्हा उपोषणाचे मार्ग अवलंबला.

​ स्ट्रीट लाईटची देखभाल व दुरुस्ती करण्याबाबतचा लागू असलेला शासन निर्णय (GR) त्वरित उपलब्ध करून द्यावा. या कामाची नेमकी जबाबदारी व कार्यपद्धती लेखी स्वरूपात स्पष्ट करण्यात यावी. गावातील बंद व नादुरुस्त स्ट्रीट लाईटची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशा मागण्या ग्रामस्थानी केल्या आहेत.

 या आंदोलनात ग्रामस्थ नितीन सावंत, आनंद पुराणिक, प्रेमानंद सावंत भोसले, साईप्रसाद केरकर, संदीप पेडणेकर, मनोहर परब आदींनी सहभाग घेतला. प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन दखलपात्र कारवाई न केल्यास भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.