
वैभववाडी : ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सक्षम करायची असेल, तर शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांनी दुग्ध व्यवसायासह विविध शेतीपूरक उद्योगांमध्ये पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच मत्स्य व्यवसायासारख्या पर्यायी उत्पन्नाच्या साधनांचाही विचार करावा, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी केले.
आचिर्णे येथे किसान गोष्टी उपक्रमांतर्गत कलिंगड लागवड मार्गदर्शन आणि पशुपालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कृषी विभागाचा आत्मा प्रकल्प, पंचायत समिती वैभववाडी आणि उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे,उपसभापती साची कोलते, गोकुळ दूध संघाचे प्राचार्य एम. पी. पाटील, प्रगतशील शेतकरी सुरेश मापारी, आत्मा सिंधुदुर्गच्या प्रकल्प उपसंचालक प्रगती तावरे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, जिल्हा परिषद सदस्य रिद्धी सुतार, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, आत्मा अध्यक्ष मंगेश कदम, जयसिंग रावराणे, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने, गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, महेश संसारे, उत्तम सुतार आदी उपस्थित होते.
सिद्धेश रावराणे पुढे म्हणाले, यांनी शेतीपूरक व्यवसायांमध्ये महिलांचा सहभाग वाढण्याची गरज आहे. कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. दुग्ध व्यवसाय, पशुपालन यांसारख्या व्यवसायांतून नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर मत्स्य व्यवसायाशी संबंधित शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन शेतकऱ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
दिलीप रावराणे म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना आर्थिक बळ देणे गरजेचे आहे. जिल्ह्यात दररोज एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ते साध्य करण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल.
बँकेच्या माध्यमातून एक हजार दुधाळ जनावरे खरेदी करण्याचे नियोजन आहे. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून सिंधुरत्न योजनेअंतर्गत जनावरे खरेदीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला २० हजार रुपयांची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. आत्मा समितीच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
गोकुळ दूध संघाचे प्राचार्य एम. पी. पाटील यांनी दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांना नियमित आणि शाश्वत उत्पन्न मिळवून देणारा उत्तम पर्याय असल्याचे सांगितले. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी गोकुळ संघ खंबीरपणे उभा असून, संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ३२ विविध योजना राबविल्या जातात. तळकोकणातील दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रगतशील शेतकरी सुरेश मापारी यांनी कलिंगड लागवड, पीक व्यवस्थापन आणि नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. कलिंगड हे चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीक असून, एका एकरात सुमारे चार हजार रोपांची लागवड करता येते. स्थानिक बाजारपेठेतही या पिकाला मागणी असल्याने शेतकऱ्यांनी नियोजनपूर्वक कलिंगड लागवड करावी. त्याचबरोबर शेतीला पूरक म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने किमान एक गाय पाळण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंगेश कदम, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, महेश संसारे आणि जिल्हा बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनीही शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार कृषी सहाय्यक बालाजी वाघमोडे यांनी मानले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








