LIVE UPDATES

नसबंदी केंद्रातील ३१ कुत्रे एकाच ठिकाणी बंदिस्त, अस्वच्छतेवर नागरिकांचा संताप

कचरा वाहतुकीच्या घंटागाडीतून कुत्र्यांची ने-आण; युथ फोरमच्या आक्षेपानंतर सभापती व मुख्याधिकाऱ्यांची धाव
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 18, 2026 07:34 PM
views 44  views

देवगड : मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेच्या नावाखाली कुत्र्यांच्या सुरक्षिततेचा आणि स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नसबंदी मोहिमेसाठी कचरा व्यवस्थापनाच्या घंटागाडीचा वापर कुत्र्यांच्या वाहतुकीसाठी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तर जामसंडे येथील प्राणी जन्म नियंत्रण केंद्रात एकाच खोलीत १९, तर दुसऱ्या खोलीत १२ कुत्र्यांना बंदिस्त ठेवण्यात आल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले. याच ठिकाणी नवजात पिल्लेही ठेवण्यात आल्याने केंद्रातील स्वच्छता, व्यवस्थापन आणि कुत्र्यांच्या देखभालीबाबत युथ फोरम-देवगडसह जागरूक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

नागरिकांच्या आक्षेपानंतर स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी आणि मुख्याधिकारी देवदत्त माने यांनी केंद्राची पाहणी केली. देवगड-जामसंडे नगरपंचायत क्षेत्रात मोकाट कुत्र्यांची नसबंदी मोहीम एका खासगी एजन्सीमार्फत राबविण्यात येत आहे.

मंगळवारी रात्री नगरपंचायतीच्या घंटागाडीतून कुत्र्यांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच युथ फोरमचे अध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगांवकर यांच्यासह सोहम पारकर, श्रुती माणगांवकर, दीपक जानकर, गोविंद माळी, जितेश मोहिते, ओंकार सारंग, तौकिर शेख, ऋत्विक धुरी तसेच स्थानिक ग्रामस्थ नाना सारंग, रवींद्र चिंदरकर आदींनी केंद्रावर धाव घेतली.

कुत्रे पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एजन्सीच्या वाहनाला काही दिवसांपूर्वी आग लागून नुकसान झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून नगरपंचायतीच्या घंटागाडीचा वापर केला जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र, कचरा वाहतुकीसाठी असलेल्या घंटागाडीचा वापर कुत्र्यांच्या वाहतुकीसाठी करणे अयोग्य असल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला. नसबंदी मोहिमेसाठी स्वतंत्र वाहन किंवा भाडेतत्त्वावर वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

केंद्राच्या पाहणीदरम्यान एका खोलीत १९ आणि दुसऱ्या खोलीत १२ कुत्रे बंदिस्त असल्याचे दिसून आले. एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने कुत्रे ठेवण्यात आल्याने त्यांची गैरसोय होत असून, परिसरात अस्वच्छता असल्याचा आरोप नागरिकांनी केला. याच खोल्यांमध्ये नवजात पिल्लेही ठेवण्यात आली होती. गरोदर कुत्रींनाही पकडून वाहनांमध्ये कोंबले जात असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने नागरिकांनी व्यवस्थापनाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.

यानंतर घटनास्थळी दाखल झालेले स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी यांनी घंटागाडीच्या वापराबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. मुख्याधिकारी देवदत्त माने यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत केंद्राची पाहणी केली. केंद्रात दैनंदिन स्वच्छता, कुत्र्यांना दिले जाणारे खाद्य आणि इतर कामांची लेखी नोंद ठेवण्याचे निर्देश त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले. तसेच क्षमतेपेक्षा अधिक कुत्र्यांना एका खोलीत ठेवू नये, अशा स्पष्ट सूचना केल्या.

कुत्र्यांसाठी उपलब्ध असलेले पिंजरे नादुरुस्त असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिल्यानंतर सभापती बुवा तारी यांनी पिंजऱ्यांच्या दुरुस्तीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. पिंजरे दुरुस्त करून त्यामध्ये क्षमतेनुसारच कुत्र्यांना ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

दरम्यान, नसबंदी मोहिमेत घंटागाडीचा वापर होत असल्याबाबत मुख्याधिकारीही अनभिज्ञ असल्याचे चर्चेतून समोर आले. अशा प्रकारचे निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, कचरा व्यवस्थापनासाठी असलेल्या वाहनाचा वापर त्याच कामासाठी करावा आणि केंद्रातील स्वच्छता व कुत्र्यांची योग्य देखभाल सुनिश्चित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी हरीदत्त माने यांनी दिले.


ताजी बातमी

View all

रिक्षाचालकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
November 18, 2026
शायना एनसी यांच्या कृतीचा सिंधुदुर्ग महिला काँग्रेसकडून निषेध
November 18, 2026
समान नागरी कायद्याबाबत २१ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनसुनावणी
November 18, 2026
Sindhudurg district administration planning the Ghar Ghar Samvidhan initiative for Constitution Day 2026.
Ghar Ghar Samvidhan : ‘घर घर संविधान’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन
November 18, 2026
संबंधित बातम्या

View all

शायना एनसी यांच्या कृतीचा सिंधुदुर्ग महिला काँग्रेसकडून निषेध
November 18, 2026
समान नागरी कायद्याबाबत २१ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनसुनावणी
November 18, 2026
Sindhudurg district administration planning the Ghar Ghar Samvidhan initiative for Constitution Day 2026.
Ghar Ghar Samvidhan : ‘घर घर संविधान’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन
November 18, 2026
महिलांनी दुग्ध व्यवसायासह शेतीपूरक उद्योगांत पुढाकार घ्यावा
November 18, 2026