
सावंतवाडी : सोनिया गांधी यांच्या ‘Belonging : A Journey of Love’ या पुस्तकाच्या प्रती फाडून निषेध व्यक्त केल्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेचा सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी समीर वंजारी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. राजकीय मतभेद असू शकतात; मात्र त्यासाठी पुस्तकं किंवा नेत्यांच्या प्रतिमा फाडणे ही वैचारिक दिवाळखोरी असल्याची टीका त्यांनी केली.
सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील विचारांशी मतभेद असल्यास ते वैचारिक पद्धतीने मांडता येतात. पुस्तक वाचून त्यातील विचारांना मुद्देसूद उत्तर देणे अपेक्षित आहे. मात्र पुस्तकाची पाने फाडून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणे ही योग्य राजकीय संस्कृती नसल्याचे वंजारी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शायना एन.सी. यांनी पुस्तकाचा निषेध करताना फाडलेल्या एका छायाचित्रावरूनही वाद निर्माण झाला आहे. या प्रतिमेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा असल्याचे दिसत असल्याचा दावा करत वंजारी यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर संबंधित फोटो मणिशंकर अय्यर यांचा असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
‘व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रतिमेबाबत जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यातच मी तो फोटो दहा वेळा फाडेन, असे वक्तव्य करणे या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढवणारे आहे,’ असे वंजारी यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या विचारांशी सहमत किंवा असहमत असण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र त्यांच्या प्रतिमेचा अवमान होता कामा नये, अशी भूमिका वंजारी यांनी मांडली.
शिंदे गट स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसदार म्हणवतो. त्यामुळे त्यांच्या नावाचा आणि विचारांचा राजकीय वापर करताना त्यांच्या प्रतिमेचा व सन्मानाचा आदर राखण्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. वारसा केवळ नावाने नव्हे, तर कृतीतून आणि विचारांप्रती असलेल्या निष्ठेतून सिद्ध होतो, अशी टीकाही त्यांनी केली.
महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक संघर्षाऐवजी वैयक्तिक टीका, प्रतीकांचा अवमान आणि प्रसिद्धीसाठी केले जाणारे प्रकार वाढत असल्याचा आरोप वंजारी यांनी केला. ‘पुस्तकं फाडणे, फोटो फाडणे किंवा जाळपोळ करणे याला राजकीय आंदोलन म्हणता येणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
‘राजकीय विरोध व्यक्त करण्यासाठी आता महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या आणि ज्येष्ठ नेत्यांच्या प्रतिमांचा अवमान करणे हाच मार्ग उरला आहे का?’ असा थेट सवालही साक्षी वंजारी यांनी शायना एन.सी. यांना केला.
‘राजकारण करा, वैचारिक संघर्ष करा; पण महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि मान्यवर नेत्यांच्या सन्मानाशी खेळू नका,’ असे आवाहन करत साक्षी समीर वंजारी यांनी शायना एन.सी. यांच्या कृतीचा आणि त्यानंतर करण्यात आलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








