
कणकवली : कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या आदेशानुसार कणकवली शहरातील नरडवे रोडवरील श्रीधर नाईक चौक ते म्हसकर हॉस्पिटल पर्यंत असलेले स्टॉल व दुकाने हटविण्यात येणार असल्याच्या सूचना नगरपंचायतीने सोमवारी स्पिकरवरून जाहीर केल्या होत्या. केवळ नरडवे रोडवरील अतिक्रमणे हटविण्याची सूचना मुख्याधिकाऱ्यांनी दिल्याने माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आक्रमक होत आज कणकवली नगरपंचायतमध्ये भेट देऊन मुख्याधिकारी गौरी पाटील यांना याचा जाब विचारला. शहरातील अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा केवळ नरडवे रोडवरील गरीब स्टॉल धारकांवर अन्याय नको. सर्वांना लेखी नोटीसा काढून अतिक्रमणे हटविण्यासाठी वेळ द्यावा असे वैभव नाईक यांनी सांगितले.
यावेळी नरडवे रोडवरील दुकान व स्टॉल धारक उपस्थित होते त्यांनी आपली दुकाने व स्टॉल हे रस्त्यावर नसून फुटपाथच्या देखील बाहेर आहेत. त्यामुळे वाहतुकीस कोणताही अडथळा होत नाही असे सांगतिले. केवळ नरडवे रोडवरीलच अतिक्रमणे काढण्याची घाई का? असा सवाल वैभव नाईक यांनी गौरी पाटील यांना केला.त्यावर गौरी पाटील यांनी अतिक्रमण काढण्याच्या सर्वांना नोटिसा देणार असल्याचे सांगत उद्यापासून कणकवली बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविणार असल्याचे सांगितले. त्यावर वैभव नाईक यांनी, अतिक्रमणे काढली तर सर्वांची काढली पाहिजेत असे पुन्हा ठणकावून सांगितले.











