LIVE UPDATES

‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या कविसंमेलनात द. भा. धामणस्करांना काव्यातून श्रद्धांजली

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 26, 2026 15:54 PM
views 26  views

सिंधुदुर्ग : ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांच्या निधनाने शब्दांचे मर्म जाणणाऱ्या, संवेदनशील आणि ऋजू व्यक्तिमत्वाच्या कवीला मराठी काव्यरसिक मुकला आहे, अशा शब्दांत नुकतेच निधन पावलेले कै. धामणस्कर यांना ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या ओरोस येथील कविसंमेलनात श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांना समर्पित केलेल्या आणि रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळालेल्या या कविसंमेलनात पंधरा कवींनी कविता सादर केल्या.

‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या अठराव्या मासिक कार्यक्रमानिमित्त ‘श्रावणधारा’ कविसंमेलन ओरोस येथे आयोजित केले होते. यावेळी व्यासपीठावर उपक्रमाचे समन्वयक सतीश लळीत, ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे, कवी सुरेश पवार उपस्थित होते.

श्री. लळीत यांनी कै. धामणस्कर यांच्या साहित्यिक प्रवासाची माहिती दिली. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवी घेतलेले धामणस्कर यांनी उपजीविका म्हणून रिझर्व बँकेत नोकरी केली. मात्र त्यांची जीविका काव्य हिच होती. वयाच्या १७ व्या वर्षी पहिली कविता लिहिणाऱ्या धामणस्कर यांनी अल्पावधीत सत्यकथा, मौज, कविता-रती सारख्या दर्जेदार वांग्मयीन नियतकालिकात स्थान मिळवले. त्यांनी अतिशय मोजके पण समृद्ध काव्यलेखन केले.

त्यांचे ‘प्राक्तनाचे संदर्भ’, ‘बरेच काही उगवून आलेले’ आणि ‘भरून आलेले आकाश’ या काव्यसंग्रहाना रसिकांनी डोक्यावर घेतले. त्यांचे निधन हा फार मोठा धक्का आहे, असे श्री. लळीत म्हणाले. श्री. धामणस्कर याना श्रद्धांजली अर्पण केल्यावर कविसंमेलनाला सुरुवात झाली. यावेळी संध्या तांबे, डॉ. सई लळीत, सुरेश पवार, पुरुषोत्तम लाडू कदम, सुधीर गोठणकर, मधुकर जाधव, नम्रता रासम, प्रगती पाताडे, मनोहर सरमळकर, मिताली मुळिक, मनीषा पाताडे, सीमा मसुरेकर, सुस्मिता राणे, आर्या बागवे, अपर्णा जोशी यांनी वेगवेगळ्या विषयांवरील कविता सादर केल्या.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या प्रिया आजगावकर, डॉ. संदीप नाटेकर, डॉ. प्रतिमा नाटेकर, विष्णुप्रसाद दळवी उपस्थित होते. सर्वच कवितांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.