
सिंधुदुर्गनगरी : भरधाव व निष्काळजीपणे टेम्पो ट्रॅव्हल्स चालवून दुचाकीस्वाराला गंभीर जखमी केल्याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने चालकाला दोषी ठरवत तीन महिन्यांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच विविध कलमांनुसार एकूण ३ हजार ५०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
१७ मार्च २०२२ रोजी जखमी व्यक्ती अॅक्टिव्हा दुचाकीवरून ओरोस-ओवळीये मार्गे जात असताना रानबांबुळी तिठा येथे कसालकडे वळण घेत होते. त्यावेळी आरोपी पांडुरंग गंगाराम कांबळे (रा. खोपकर कॉलनी, धनकवडी, पुणे) याने कसाल-मालवण मार्गावर भरधाव वेगाने टेम्पो ट्रॅव्हल्स चालवत येऊन दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला, तर दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
या प्रकरणी जखमीच्या भावोजी उमेश शिर्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १८ मार्च २०२२ रोजी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम २७९, ३३७, ३३८ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास महिला पोलीस नाईक राणे यांनी केला.
सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. शिल्पा गोबाडे यांनी आठ साक्षीदारांची तपासणी करून न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. त्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी ए. ए. चेंडके यांनी आरोपीला दोषी ठरवत कलम २७९, ३३७ व ३३८ अंतर्गत प्रत्येकी तीन महिन्यांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच विविध कलमांनुसार एकूण ३,५०० रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान महिला पोलीस शिपाई शिंदे यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले. या निकालामुळे निष्काळजी वाहनचालकांवर कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.











