
सिंधुदुर्गनगरी : नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सिंधुदुर्गातील शेकडो युवक-युवतींसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील लिपिक पदासाठी परीक्षा देऊन गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या ७३ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून त्यांना लवकरच नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. याचबरोबर आणखी ६७ पदे भरण्यास मान्यता मिळाल्याने जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मान्यता मिळालेल्या ६७ पदांच्या भरतीची प्रक्रिया जिल्हा बँकेच्या एजन्सीमार्फत पुढील दोन दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. तसेच बँकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रियादेखील येत्या दोन महिन्यांत सुरू केली जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची मागील भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निष्पक्ष आणि गुणवत्तेच्या आधारे पार पडली होती. कोणत्याही प्रकारच्या शिफारशी किंवा दबावाला बळी न पडता केवळ गुणवत्ता आणि बुद्धिमत्तेच्या निकषावर उमेदवारांची निवड करण्यात आली होती. आगामी भरती प्रक्रियेतही हीच पारदर्शकता कायम ठेवली जाणार असल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले.
“जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आणि बेरोजगार युवकांनी आतापासूनच परीक्षेची तयारी सुरू करावी. मेहनत, अभ्यास आणि गुणवत्ता यांच्या जोरावरच यश मिळणार असून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहनही त्यांनी केले.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबांच्या रोजगाराच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्याने युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ही भरती प्रक्रिया जिल्ह्याच्या रोजगार क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई तसेच सर्व संचालक उपस्थित होते.











