
ठेकेदारावर दाखल करावा गुन्हा : नगरसेवक देव्या सुर्याजी
सावंतवाडी : 57 कोटींच्या नळपाणी योजनेच्या काम करताना काही भागातील काम ठेकेदाराने अर्धवट सोडून दिलं गेलं. नाशिकचा जगताप नामक ठेकेदार सावंतवाडीत कधी दिसलाही नाही. आज हे काम अर्धवट टाकल्याने रस्त्यावर मारलेल्या होलमध्ये लहान मुलांसह नागरिकांचे पाय जाऊन दुखापत होत आहे. खडीकरण केलेल्या भागात खड्डे पडून लोक जखमी होत आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केली आहे.
ते म्हणाले, उभाबाजार येथील रस्त्यावर खड्डे पडले असून नळपाणी योजनेच्या ठेकेदाराकडून भर रस्त्यात मारलेल्या होलमध्ये पाय अडकून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला जखमी होत आहेत. पाय मुरगळण्याचे प्रकर होत असून नगरपरिषद प्रशासनाकडून हे खड्डे बुजविण्यासाठी जबाबदारी घेतली जात नाही आहे. संबंधित ठेकेदार शहरात नसू़न ते गायब आहेत. पाणी पुरवठा विभागाला अभियंता नसून ५७ कोटींच काम करणारा नाशिकचा जगताप नामक ठेकेदार सावंतवाडीत कधी दिसतही नाही. आज खडीकरण केलेल्या भागात देखील खड्डे पडून अपघात होत असून जर नागरिकांना गंभीर इजा झाल्यास जबाबदार कोण ? असा सवाल त्यांनी केला. तर अशा घटना घडल्यास संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच ४० टक्के काम झाल्याचा दावा संबंधित ठेकेदाराकडून केला जात असून २० कोटीच बील देखील अदा करण्यात आले आहे. मात्र, अशी बोगस काम झाल्यास ही बील कशी काढली गेली ? तसेच झालेल्या कामाच्या दर्जाबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी आयुक्त व संबंधित प्रशासनाकडे करणार असल्याचे नगरसेवक श्री.सुर्याजी यांनी सांगितले.











