LIVE UPDATES

भरधाव डंपरची पिता- पुत्राला जोरदार धडक

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 01, 2026 21:15 PM
views 78  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील ओसरगाव पारभाटलेवाडी येथे भरधाव डंपरने समोरून दुचाकीला धडक दिल्याने पिता-पुत्र जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले असून डंपर चालकाविरोधात कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

मालवण तालुक्यातील राठीवडे, मेस्त्रीवाडी येथील भास्कर सत्यवान मेस्त्री (वय ४०) हे वडील सत्यवान मेस्त्री यांच्यासह दुचाकी (एम.एच.-०७-ए.टी.-७७१७) वरून कसालहून राठीवडेकडे जात होते. ओसरगाव पारभाटलेवाडी येथील वळणावर समोरून येणाऱ्या डंपर (एम.एच.-०७-सी-५८३५) चालकाने भरधाव वेगाने व रस्त्याच्या चुकीच्या बाजूने वाहन चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या अपघातात भास्कर मेस्त्री यांना किरकोळ तर त्यांचे वडील सत्यवान मेस्त्री यांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी डंपर चालक सचिन हरिश्चंद्र सावंत (रा. कोलगाव, ता. सावंतवाडी; मूळ रा. महादेवाचे केरवडे, ता. कुडाळ) याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याची तक्रार देण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया कणकवली पोलिस ठाण्यात सुरू आहे.,