
वैभववाडीत कृषी मेळावा उत्साहात
वैभववाडी : शेती आणि शेतकऱ्यांना समृद्ध करायचे असेल तर संवेदनशील अधिकाऱ्यांची गरज आहे. भविष्यातील शेतीला ज्ञान, श्रम आणि यंत्रांची जोड द्यावी लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन समूह शेतीचा पर्याय स्वीकारावा. शेतकरी एकत्र आला तर अनेक समस्यांवर संवादातून मार्ग निघू शकतो, असे प्रतिपादन भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी वैभववाडी येथे केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील,जि.प.सदस्य श्रावणी रावराणे, रिद्धी सुतार,प.स.सदस्य सुवर्णा संसारे, मंगेश लोके, देवानंद पालांडे,साधना नकाशे, गटविकास अधिकारी प्रीमेश वाघ, सहाय्यक गटविकास स्नेहा माने,माजी सभापती बापी मांजरेकर, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, प्रगतशील शेतकरी किशोर कुडतरकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
डॉ. देवधर म्हणाले, आजच्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष काम करणारा आणि त्यांच्या अडचणी समजून घेणारा संवेदनशील अधिकारी असणे आवश्यक आहे. शेतकरी अन्न निर्माण करतो म्हणूनच संपूर्ण व्यवस्था चालते. शेतकरी अन्न निर्माण करणे थांबवेल तर आपण काय खाणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शेतीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे गरजेचे आहे. शेती ही केवळ पारंपरिक व्यवसाय नसून ती सक्रिय गुंतवणूक आहे. शेतीपूरक व्यवसायांची जोड दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.भविष्यात शेतीत नवीन प्रयोगांची गरज असल्याचे सांगताना त्यांनी हापूसपुरती मर्यादा न ठेवता पायरी, सोनपरी यांसारख्या आंबा जातींचे प्रयोग करण्याचे आवाहन केले. समस्यांचे समाधान केवळ आंदोलनातून होत नाही, तर समस्या समजून घेऊन त्यावर कृती करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.वैभववाडी विभागात मोठ्या प्रमाणात धरणे आहेत. या धरणांमुळे हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली आली आहे. मात्र उपलब्ध पाण्याचा किती उपयोग केला जातो, याचा विचार करण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुरघास मोठ्या प्रमाणात बाहेरून येतो. जिल्ह्यातच चाऱ्याचे उत्पादन करून मोठी गरज भागवता येऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी सभापती सिद्धेश रावराणे म्हणाले, अनेक जीवांची भूक भागविणारा शेतकरी समाजाचा आधार आहे. पश्चिम महाराष्ट्रात युवकांना अधिकारी किंवा शेतकरी होण्याचा सल्ला दिला जातो, ही संकल्पना कोकणातही रुजणे गरजेचे आहे. कोकणातील शेतकरी मेहनती आहे, मात्र त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
फोटो:नाधवडे येथील कृषी दिनानिमित्त आयोजित कृषी मेळाव्याचे प्रगतशील शेतकरी किशोर कुडतरकर यांनी उद्धाटन केले.











