LIVE UPDATES

भर पावसात ठाकरे शिवसेनेचं आंदोलन पेटलं

टोपल्यांमध्ये मांडला पेपरांचा बाजार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 01, 2026 12:20 PM
views 344  views

'पेपर फुटी'चा जोरदार निषेध 

कुडाळ : सध्या राज्यात स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. याच गंभीर मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारचा निषेध करण्यासाठी आज कुडाळ बाजारपेठेत उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेच्या वतीने एक अत्यंत आगळेवेगळे आणि अभिनव आंदोलन छेडण्यात आले.

आज कुडाळचा बाजाराचा दिवस असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी होती. याचाच फायदा घेत आंदोलकांनी थेट भाजी विकतात तशा टोपल्या मांडून त्यामध्ये परीक्षांचे पेपर विकण्याचे हुबेहूब सेटअप तयार केले होते. सरकारचा निषेध करण्यासाठी करण्यात आलेल्या या अनोख्या आंदोलनाने संपूर्ण बाजारपेठेचे लक्ष वेधून घेतले होते.

आंदोलनकर्त्यांनी यावेळी अत्यंत उपरोधिक आणि आक्रमक घोषणाबाजी केली. "नीट (NEET), टीईटी (TET) परीक्षांचे पेपर होलसेल दरात मिळतील", "मुलांचे भवितव्य विकत घ्या", "शिक्षण मंत्र्यांशी संपर्क करा आणि सर्व पेपर होलसेल मिळवा" तसेच "मान्सून धमाका ऑफर" अशा घोषणा देत आंदोलकांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. बाजारात आलेल्या शेकडो नागरिकांनी आणि युवकांनी हे आंदोलन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 

या आंदोलनाचे नेतृत्व करताना उबाठा शिवसेनेचे नेते मंदार शिरसाट यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले,  "या सरकारला विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या भवितव्याशी काहीही देणेघेणे उरलेले नाही. मुले रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून परीक्षांचा अभ्यास करतात, मात्र परीक्षेच्या आदल्या दिवशी पेपर फुटल्याचे समोर येते. हा सरळ सरळ लाखो मुलांच्या आयुष्याशी चाललेला खेळ आहे."

पुढे बोलताना त्यांनी थेट टोला लगावला की, "शिंदे सेनेने आधी आमदार आणि खासदार फोडले, आणि आता ते या देशातील आणि राज्यातील तरुण मुलांचे भवितव्य फोडत आहेत. या भोंगळ कारभारामुळे मुलांनी पुढे परीक्षा द्याव्यात की नाही, अशी साशंकता निर्माण झाली आहे." यावेळी आंदोलकांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत परिसर दणाणून सोडला.

या आक्रमक आंदोलनात मंदार शिरसाट यांच्यासह अमरसेन सावंत, संतोष शिरसाट, गुरुनाथ गडकर, अतुल बंगे, अर्चना बंगे, कृष्णा धुरी यांच्यासह उबाठा शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारच्या विरोधातील या अनोख्या आंदोलनाची चर्चा सध्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात रंगली आहे.