
सिंधुदुर्ग : शिक्षण,साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्याच्या सन्मानासाठी 'शारदीय प्रतिष्ठान, खारेपाटण' यांच्या वतीने गेली २ वर्षे ‘शारदीय प्रतिष्ठान पुरस्कार’ दिला जातो. ज्येष्ठ साहित्यिक स्व. प्राचार्य शरद विनायक काळे यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम रविवार, ११ऑक्टोबर रोजी वेंगुर्ले येथे होणार आहे. यावर्षीचा तिसरा ‘शारदीय प्रतिष्ठान पुरस्कार’ शशांक श्रीधर मराठे व सौ.सीमा शशांक मराठे संपादक,साप्ताहिक ‘किरात’, वेंगुर्ले, यांना प्रदान करण्यात येणार आहे.
स्व. प्राचार्य शरद विनायक काळे यांनी शिक्षण, अध्यापन, साहित्य लेखन, समीक्षा आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या पत्नी वर्षा काळे यांनीही बहुमोलाची स्त्रीशिक्षण सेवा दिली. या दाम्पत्याने खारेपाटणमधे ५६ वर्षे एक शैक्षणिक ,सामाजिक कार्य उभे केले. त्यांच्या या दाम्पत्यकार्याचा प्रेरक जागर म्हणून त्यांच्या मुलांनी स्थापन केलेल्या 'शारदीय प्रतिष्ठान'तर्फे दरवर्षी एका सेवाभावी व कलाप्रिय दाम्पत्याला हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या कार्यक्रमात मराठे दाम्पत्याबरोबरच 'किरात' मुद्रणालयाचे व्यवस्थापक मेघश्याम केशव मराठे यांचाही विशेष सन्मान होणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते रघुवीर उर्फ भाई मंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ कथाकार, देवगड बी.एड् काॅलेजचे माजी प्राध्यापक प्रा. श्रीराम विनायक काळे यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. हा कार्यक्रम रविवार,दि.११ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता साई मंगल डीलक्स हॉल, वेंगुर्ले येथे होणार असून साहित्यप्रेमी,विद्यार्थी,शिक्षक व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्व. प्राचार्य शरद विनायक काळे यांनी खारेपाटण येथे शिक्षणक्षेत्रात अध्यापनासोबतच दर्जेदार साहित्य लेखन,समीक्षा, सामाजिक कार्य व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीसमोर ठेवण्यासाठी 'शारदीय प्रतिष्ठान'तर्फे पुरस्कार वितरणाचा उपक्रम राबविला जात आहे.











