
वैभववाडी : तालुक्याला परतीच्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी झोडपून काढले. लोरे नं. २ परिसरात आज सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर कोसळल्याने वैभववाडी-फोंडा मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली. तसेच वादळी वाऱ्यामुळे गावातील काही घरांच्या छपरांचेही नुकसान झाले.
तालुक्यात आज सायंकाळी पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.लोरे भागात पावसासह वा-याचा जोर अधिक होता.या भागात झालेल्या वादळामुळे वैभववाडी-फोंडा मार्गावर चार ते पाच ठिकाणी मोठी झाडे रस्त्यावर कोसळली. लोरे बंगला, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तसेच छोटू रावराणे यांच्या घरासमोरील झाडे रस्त्यावर पडल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच भाजपचे रितेश सुतार, माजी सरपंच महेंद्र रावराणे, मंदार रावराणे, संतोष गुरव, आदित्य रावराणे, नीरज रावराणे, दीपक रावराणे, कोतवाल सुरेंद्र पेडणेकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मशीनच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेली झाडे हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर वैभववाडी-फोंडा मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
दरम्यान, वादळी वाऱ्याचा फटका परिसरातील घरांनाही बसला. काही घरांच्या छपरांचे नुकसान झाले असून, नुकसानीचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सूर्यकांत पाटील आणि पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.











