LIVE UPDATES

राजापूर तालुक्यात नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग

चार हजार हेक्टर क्षेत्र बाधित; ८९ गावांतील १,१२८ शेतकऱ्यांच्या ३५३.१५ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 06, 2026 18:48 PM
views 37  views

राजापूर : कमी पावसामुळे भातशेतीसह नाचणी, वरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना राजापूर तालुक्यात आता नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. कृषि, महसूल आणि ग्रामपंचायत यंत्रणेची संयुक्त पथके शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीची नोंद करीत आहेत. तालुक्यातील २३७ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र असल्याने निर्धारित कालावधीत सर्व पंचनामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

यावर्षी पावसाने ओढ दिल्याचा मोठा फटका भातशेतीसह नाचणी, वरी आदी पिकांना बसला आहे. राजापूर तालुक्यात सुमारे ७ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर या पिकांची लागवड करण्यात आली असून, त्यापैकी सुमारे ४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषि विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या नुकसानीमध्ये सुमारे २५ हजार शेतकरी बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर कृषि विभाग, महसूल विभाग आणि ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत तालुक्यातील ८९ गावांमधील १ हजार १२८ शेतकऱ्यांच्या एकूण ३५३.१५ हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.

दरम्यान, पीक नुकसानीच्या पंचनाम्यांच्या प्रक्रियेत जमीन मालकीचा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे. तालुक्यात अनेक शेतकरी प्रत्यक्षात शेती कसत असले तरी संबंधित जमिनीचा सातबारा उतारा त्यांच्या नावावर नसल्याची स्थिती आहे. अनेक शेतकरी जमीनमालकांकडून तोंडी कराराने अथवा अनौपचारिक पद्धतीने जमीन घेऊन शेती करतात. मात्र त्यांच्याकडे जमीन कसत असल्याचा कोणताही कागदोपत्री करार नसतो.

अशा परिस्थितीत कमी पावसामुळे प्रत्यक्ष शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईचा लाभ कोणाला मिळणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या मदतीची रक्कम संबंधित जमीनधारकाच्या नावे किंवा नोंदीनुसार जमा झाल्यास प्रत्यक्ष जमीन कसणारा आणि पीक घेणारा शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद घेऊन त्यांना योग्य पद्धतीने नुकसानभरपाईचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, तालुक्यातील सर्व बाधित क्षेत्रांचे पंचनामे वेळेत पूर्ण करून कोणताही पात्र शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.