LIVE UPDATES

sindhudurg News : अंगणवाडीत घुमणार पसायदानाचे स्वर

अंगणवाडी सेविकांना भाऊबीज म्हणून दोन हजार रुपये
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 28, 2026 06:45 PM
views 64  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्गनगरी : बालवयातच मुलांच्या मनावर चांगले विचार आणि संस्कार रुजावेत, संतांच्या विचारांची ओळख व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये पसायदान ऐकविण्याचा उपक्रम राबविण्यात यावा, अशी सूचना जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा नारकर यांनी केली. बालकांच्या सर्वांगीण जडणघडणीत संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी या उपक्रमावर भर दिला. दरम्यान, अंगणवाडी सेविकांना भाऊबीज म्हणून दोन हजार रुपये देण्यात येणार असून, जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील भौतिक सुविधांचीही विशेष मोहिमेद्वारे तपासणी केली जाणार आहे.

जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीची सभा बुधवारी (२८ ऑक्टोबर) छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती अनुराधा नारकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत अंगणवाड्यांमधील सुविधा, बालकांचे पोषण आणि संस्कारक्षम वातावरण निर्माण करण्यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रभारी समिती सचिव वैशाली काकडे, समिती सदस्य हर्षदा वाळके, आरती पाटील, शोभा गावडे, सुप्रिया मेस्त्री, अवनी तेली, क्षमा हडकर, मिलिंद नाईक तसेच तालुका प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

अंगणवाड्यांतून संतविचारांची ओळख

लहान वयात मुलांच्या मनावर झालेले संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना पसायदान ऐकविण्यात यावे, अशी सूचना सभापती नारकर यांनी केली. संतांच्या विचारांतून बालकांना चांगल्या मूल्यांची ओळख व्हावी आणि त्यांच्यात सकारात्मक विचारांची रुजवण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

अंगणवाडी सेविकांना भाऊबीजेची भेट

अंगणवाडी सेविकांना शासनाकडून भाऊबीज म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली. तसेच ७ आणि ८ नोव्हेंबर २०२६ या दोन दिवसांसाठी अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सुट्टीच्या कालावधीतही बालकांच्या पोषण आहारात खंड पडू नये, यासाठी आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना शासनाने दिल्याचे सभेत स्पष्ट करण्यात आले.

अंगणवाड्यांची होणार ‘क्रॉस चेकिंग’

जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबरदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत एका बीटमधील मुख्यसेविका किंवा पर्यवेक्षिका दुसऱ्या बीटमधील अंगणवाडी केंद्रांची तपासणी करणार आहेत. त्यामुळे उपलब्ध सुविधांची पडताळणी करताना प्रत्यक्ष स्थिती आणि नोंदी यांची तुलना करता येणार आहे.

या तपासणीमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालय, सौरऊर्जा संच आणि डिजिटल नोंदी यांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीचा अहवाल दर आठवड्याला सादर करण्याचे निर्देश सभापती अनुराधा नारकर यांनी दिले. अंगणवाड्यांमधील सुविधांची सद्यस्थिती स्पष्ट होऊन त्रुटी निदर्शनास आणण्यास या मोहिमेची मदत होणार आहे.

बालकांना संस्कारक्षम वातावरण मिळावे, त्यांच्या पोषणात सातत्य राहावे आणि अंगणवाड्यांमधील मूलभूत सुविधा सक्षम असाव्यात, या दृष्टीने महिला व बालविकास समितीच्या सभेत विविध मुद्द्यांवर भर देण्यात आला.