
सिंधुदुर्गनगरी : माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबाशी संबंधित प्रकरणावरून सत्ताधारी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक राजकारण केले जात असून, या माध्यमातून राऊत कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या जान्हवी सावंत आणि महिला जिल्हाप्रमुख श्रिया सावंत यांनी केला. कौटुंबिक वादाला राजकीय रंग देणे चुकीचे असून अशा प्रकारचे राजकारण थांबवावे, अशी मागणीही त्यांनी केली.
माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जान्हवी सावंत यांनी सांगितले की, गिरिजा राऊत या २०२३ मध्ये राऊत कुटुंबापासून वेगळ्या झाल्या होत्या. त्यानंतर इतका मोठा कालावधी उलटल्यानंतर आता हा विषय पुढे येत असल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. जर त्यांच्यावर अन्याय झाला असेल, तर त्यावेळीच तक्रार दाखल करण्यात आली असती तर त्यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक लवकर सुरू झाली असती, असे त्या म्हणाल्या.
त्यांनी आरोप केला की, गिरिजा राऊत या माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून आणि नगरसेवक गीतेश राऊत यांच्या पत्नी असल्यानेच या प्रकरणाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या कुटुंबांमध्येही वैयक्तिक वाद असतात; मात्र उद्धवसेना कधीही अशा विषयांचे राजकारण करत नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही निवडक भूमिका घेणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिलांवरील अत्याचारांच्या विविध घटनांवर सत्ताधारी महिला पदाधिकाऱ्यांनी सातत्याने भूमिका घेतलेली दिसत नाही, असा आरोप करताना त्यांनी मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराची घटना तसेच जिल्ह्यात घडलेल्या विविध महिला अत्याचाराच्या प्रकरणांचा उल्लेख केला. अशा घटनांवेळी मौन बाळगणारे लोक आज अचानक सक्रिय का झाले आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
गिरिजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या काही घटनांच्या वेळी त्यांचे आई-वडीलही त्यांच्यासोबत असल्याचा दावा करत त्या संदर्भातील सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी जान्हवी सावंत यांनी केली.
महिला जिल्हाप्रमुख श्रिया सावंत यांनीही सत्ताधारी पक्षावर टीका करताना, राऊत कुटुंबाला राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्यासाठी काही शक्ती पडद्यामागून कार्यरत असल्याचा आरोप केला. जिल्ह्यातील महिला प्रश्नांवर आवाज न उठविणारे लोक या प्रकरणात मात्र आक्रमक भूमिका घेत असल्याचे त्यांनी म्हटले.
'लाडकी बहीण' योजनेच्या संदर्भात बोलताना त्यांनी निवडणुकीपूर्वी महिलांना मोठ्या प्रमाणात आश्वासने देण्यात आली, मात्र नंतर लाखो महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचा दावा केला. या प्रश्नावर सत्ताधारी महिला पदाधिकारी भूमिका घेणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच राऊत कुटुंबाच्या सुनेला सुरक्षा देण्याची मागणी करणाऱ्या भाजप महिला पदाधिकाऱ्यांचा स्वतःच्या सरकारवर विश्वास नाही का, असा प्रश्न उपस्थित करत चाकणकर प्रकरणासह अन्य संवेदनशील विषयांवर त्यांनी कोणती भूमिका घेतली होती, याचेही उत्तर जनतेसमोर द्यावे, असे आव्हान जान्हवी सावंत यांनी दिले.
या पत्रकार परिषदेमुळे राऊत कुटुंबाशी संबंधित वादाला नव्याने राजकीय परिमाण प्राप्त झाले असून, या प्रकरणावर आरोप-प्रत्यारोपांची मालिका आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.











