
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सेवेला नवी उभारी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांना ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. त्याचबरोबर १८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १७ आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी तब्बल ३७ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या विस्ताराला मोठी चालना मिळणार आहे.
ही माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या मासिक सभेत दिली. सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे, सदस्य संतोष पारकर, रुपेश पावसकर, सुनील पारकर, अवनी तेली, श्वेता धरणे, यज्ञा साळगावकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अत्यंत स्पष्ट शब्दांत मार्गदर्शन केले. "कोणत्याही आजारामुळे एकही रुग्ण दगावता कामा नये. प्रत्येक डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांनी हेच आपले अंतिम लक्ष्य मानून काम केले पाहिजे," असे सांगत त्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर, दर्जेदार आणि प्रभावी आरोग्य सेवा मिळणे ही यंत्रणेची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले.
आरोग्य सेवेतील गुणवत्ता, तत्परता आणि संवेदनशीलता वाढविण्यावर भर देताना उपचार प्रक्रियेत कोणतीही दिरंगाई अथवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. नव्याने मंजूर झालेल्या निधीमुळे आणि ग्रामीण रुग्णालयाच्या दर्जामुळे जिल्ह्यातील हजारो नागरिकांना अधिक सुसज्ज, आधुनिक आणि व्यापक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
डास नियंत्रणासाठी 'गप्पी मासे' अभियान पुन्हा सुरू होणार
डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आलेली 'गप्पी मासे पैदास केंद्र' योजना अनेक ठिकाणी बंद पडली आहे. साचलेल्या पाण्यातील डासांच्या अळ्या खाऊन त्यांची वाढ रोखण्यास हे मासे प्रभावी ठरतात. त्यामुळे सर्व केंद्रे तातडीने पुन्हा सुरू करण्याचे निर्देश सीईओ रवींद्र खेबुडकर यांनी दिले.
९ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर
ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतर संबंधित केंद्रांमध्ये आरोग्य सुविधांचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे. सध्या असलेली ७ खाटांची क्षमता ३० खाटांपर्यंत वाढणार असून ऑपरेशन थिएटर, तज्ज्ञ वैद्यकीय सेवा, वाढीव कर्मचारीवर्ग आणि रुग्णांना दाखल ठेवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळालेली केंद्रे
फोंडा, पडेल, मसुरे, शिरगाव, मिठबाव, बांदा, कासार्डे, खारेपाटण आणि माणगाव
१७ आरोग्य उपकेंद्रांसाठी १०.३७ कोटींची तरतूद
पंधराव्या वित्त आयोगातून १० कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून १७ नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. प्रत्येक उपकेंद्रासाठी सुमारे ६१ लाख रुपये उपलब्ध होणार आहेत.
प्रस्तावित उपकेंद्रे
कुसूर, साळशी, नाटळ, तारकर्ली, वाडोस, गोठोस, जांभवडे, घोडगे, कनयाळ, मोचेमाड, कर्ली, चौकुळ, आरोंदा, मळगाव, दानोली, तळवडे क्रमांक २ आणि तिलारी.
१८ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नव्या इमारतींसाठी निधी
जिल्ह्यातील १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नवीन इमारतींसाठी प्रत्येकी १ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले असून एकूण सुमारे २७ कोटी रुपयांच्या कामांना गती मिळणार आहे.
या केंद्रांचा समावेश
देवगड तालुक्यातील इळये, शिरगांव, पडेल; कणकवलीतील खारेपाटण, नांदगाव; मालवणमधील चौके, हिवाळे, मसुरे; कुडाळमधील कसाल, माणगाव, पणदूर; सावंतवाडीतील आंबोली, निरवडे; वेंगुर्ल्यातील रेडी, तुळस, आडेली; तसेच दोडामार्गमधील मोरगाव आणि तळकट.
ग्रामीण आरोग्य सुविधांच्या उन्नतीसाठी मंजूर झालेला हा निधी आणि रुग्णालयांचा वाढलेला दर्जा सिंधुदुर्गच्या आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांनाही आता अधिक दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा त्यांच्या गावाजवळच उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.














