LIVE UPDATES

कणकवलीत स्टॉलधारकांकडून स्टॉल हटवण्यास सुरुवात

प्रशासनाच्या कारवाईला स्टॉलधारकांचा सकारात्मक प्रतिसाद
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 15, 2026 12:25 PM
views 285  views

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील अतिक्रमित स्टॉल हटविण्याची कार्यवाही कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी चार दिवसांपूर्वी हाती घेतली होती. त्यानंतर संबंधित स्टॉलधारकांनी स्वतःहून हे स्टॉल काढून घ्यायला सुरुवात केली आहे. नगरपंचायत प्रशासनाने यापूर्वी स्टॉल हटविण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. त्या मुदतीनुसार आता स्टॉलधारकांनी स्वतः स्टॉल हटवण्यास सुरुवात केली आहे.चार दिवसांपूर्वी कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जेसीबीच्या साहाय्याने बंद असलेले काही स्टॉल हटविण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित स्टॉलधारकांना स्वतःहून अतिक्रमण हटविण्याचे आवाहन करण्यात आले होते.

रुग्णालय परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी करणे, रुग्ण व नातेवाईकांना ये-जा करण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करून देणे आणि सार्वजनिक सुविधांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने नगरपंचायत प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे.स्टॉलधारकांनी स्वतःहून स्टॉल हटविण्यास सुरुवात केल्याने प्रशासनाच्या कारवाईला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र असून, रुग्णालय परिसर अतिक्रमणमुक्त करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची पायरी मानली जात आहे.