
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद सिंधुदुर्गतर्फे आयोजित भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा २०२६ चा अंतिम निकाल जाहीर झाला असून, इयत्ता चौथीमध्ये ४७.४९ टक्के, तर इयत्ता सातवीमध्ये १३.६८ टक्के निकाल लागला आहे. इयत्ता चौथीत कुडाळ तालुक्यातील नेरूर सांबरा येथील जिल्हा परिषद शाळेचा शार्विल आनंद बर्वे प्रथम, तर सातवीत सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी क्रमांक ४ येथील सोहम सुधीर गावडे प्रथम आला आहे. याबाबतची माहिती आजच्या शिक्षण समिती सभेत देण्यात आली.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, अभ्यासाची सवय लागावी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना मिळावी या उद्देशाने सन २०१८ पासून ही परीक्षा घेतली जाते. यावर्षी २३ एप्रिल रोजी जिल्ह्यातील ४१ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.
इयत्ता चौथीसाठी ४,१६८ आणि इयत्ता सातवीसाठी १,८४६ असे एकूण ६,०१४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी चौथीतील १,८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ४७.४९ टक्के लागला. सातवीतील २३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल १३.६८ टक्के लागला.
इयत्ता चौथीमध्ये शार्विल आनंद वरुते (जि.प. शाळा नेरूर, कुडाळ) प्रथम, तन्वी तानाजी भोसले (जि.प. शाळा साळशी नं. १, देवगड), तर शांभवी उत्तम मोहिते (जि.प. शाळा पुरळ देवगड) तृतीय आली आहे.
इयत्ता सातवीमध्ये सोहम सुधीर गावडे (जि.प. शाळा सावंतवाडी नं. ४) प्रथम, द्वितीय, श्रीनिवास बाबुराव मयेकर (जि.प. शाळा वेगुर्ले नं. ३, वेंगुर्ले) द्वितीय, तर पूर्वा गजानन राणे (जि.प. केंद्रीय शाळा हिंदळे नं. १, देवगड) तृतीय आली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण समिती सभेत अभिनंदन करण्यात आले असून जिल्हास्तरावर आणि तालुका स्तरावर अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत बोलवून सत्कार करावा अशी सूचना देखील सभापती प्रितेश राऊळ यांनी केली.











