LIVE UPDATES

'एक गाव, एक शाळा' उपक्रम राबवा

कमी पटसंख्येच्या शाळांच्या विलीनीकरणाची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 16, 2026 19:53 PM
views 26  views

सिंधुदुर्गला लवकरच २८२ नवीन शिक्षक

सिंधुदुर्गनगरी : कमी पटसंख्येच्या शाळांमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरण, क्रीडा व बौद्धिक विकासाच्या संधींपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे कमी पटसंख्येच्या शाळा मोठ्या पटसंख्येच्या शाळांना जोडून 'एक गाव, एक शाळा' हा उपक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत सदस्य रामा गवस यांनी केली. या मागणीची दखल घेत कमी पटसंख्येच्या किती शाळा एकत्रित करता येतील, याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेश सभापती प्रितेश राऊळ यांनी दिले.

जिल्हा परिषद शिक्षण समितीची बैठक सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. या सभेत सदस्य रामा गवस यांनी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित केला. शासनाच्या विविध उपक्रमांमुळे शिक्षक वारंवार वर्गाबाहेरील कामात गुंतत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. काही शाळांमध्ये केवळ एक ते पाच विद्यार्थी असतानाही दोन शिक्षक कार्यरत आहेत, तर दुसरीकडे मोठी पटसंख्या असूनही शिक्षकांची कमतरता आहे. हा असमतोल दूर करण्यासाठी कमी पटसंख्येच्या शाळा मोठ्या शाळांशी जोडण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, एकाच गावात दोन किंवा अधिक शाळा असून त्यांची पटसंख्या समाधानकारक असेल, तर त्या ठिकाणी 'एक गाव, एक शाळा' उपक्रम लागू करू नये, अशी सूचना सदस्य नितीन राऊळ यांनी केली.

आर्यादुर्गानगर शाळेलगतची जीर्ण इमारत तत्काळ पाडा

 बैठकीत कणकवली तालुक्यातील वागदे-आर्यादुर्गानगर शाळा क्रमांक ५ शेजारील जुन्या अंगणवाडी इमारतीचा मुद्दाही उपस्थित झाला. इमारतीचे छप्पर काढण्यात आले असले तरी भिंती अद्याप उभ्या असल्याने शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे रामा गवस यांनी निदर्शनास आणून दिले. यावर संबंधित इमारतीच्या भिंती तातडीने पाडण्याचे आदेश सभापतींनी दिले.

छप्पर पडले हे प्रशासनासाठी लज्जास्पद

 डेगवे येथील शाळेचे छप्पर कोसळल्याची घटना प्रशासनासाठी लज्जास्पद असल्याची टीका सदस्य नितीन राऊळ यांनी केली. शाळा नादुरुस्त असतानाही दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले. शिक्षण विभागाने वेळेत सर्वेक्षण केले नसल्याने ही घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला.

२८२ शिक्षक मिळणार 

बैठकीत सभापती प्रितेश राऊळ यांनी जिल्ह्यातील शिक्षक भरतीबाबतही महत्त्वाची माहिती दिली. शासनाने रिक्त पदांपैकी ८० टक्के पदे भरण्यास मान्यता दिली असून, लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरतीतून सिंधुदुर्ग जिल्ह्याला २८२ नवीन शिक्षक मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.