LIVE UPDATES

पाणी टंचाईबाबत आतापासूनच उपाययोजना करा

माजी नगराध्‍यक्ष समीर नलावडेंची न. पं. कडे मागणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 01, 2026 13:04 PM
views 30  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कणकवली : कमी पावसामुळे यावर्षी पाणीटंचाईचे संकट येण्‍याची भिती आहे. त्‍यासाठी कणकवली नगरपंचायत प्रशासनाने आतापासूनच योग्‍य त्‍या उपाययोजना करण्‍याची गरज आहे. या समस्‍येवर मात करण्‍यासाठी आम्‍ही सर्वजण न. पं. प्रशासनाला मदत करू. याप्रश्नी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन कणकवलीचे माजी नगराध्‍यक्ष समीर नलावडे यांनी केले.

येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. नलावडे म्‍हणाले, कमी पावसामुळे यावर्षी पाणी टंचाईचे संकट येण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यासाठी कणकवली नगरपंचायत व नागरिकांनी आतापासूनच उपाययोजना करायला हव्‍यात. कणकवली शहरातून जाणार्‍या नद्‍यांमध्‍ये छोटे - छोटे बंधारे बांधता येतील का, याचा विचार नगरपंचायतीने करायला हवा. साधारण उन्‍हाळा सुरु झाला की शिवडाव धरणाचे पाणी सोडण्‍याची वेळ येते. 

हे पाणी कणकवलीत १५ ते २० दिवसांनी पोहोचते. या पाण्‍याबाबतही आतापासूनच उपाययोजना करायला हवी. कणकवली शहरातील पाण्‍याच्‍या टाक्‍यांमधील पाणी बर्‍याचदा वाहत असल्‍याचे दिसून येते. पाणी अशा रितीने वाया जाता कामा नये, यासाठी नगरपंचायत प्रशासनाने दक्ष राहणे गरजेचे आहे. कणकवली शहरात नळ कनेक्‍शन दिली आहेत, तेथे अनेक ठिकाणी कॉक नाहीत. परिणामी पाणी वाहून जाते. याबाबत न. पं. प्रशासनाने टिम नेमून कॉक बसवून घ्‍यावेत, असे नलावडे म्‍हणाले.

कणकवली शहराची लोकसंख्‍या साधारण २५ हजारच्‍या आसपास आहे. प्रत्‍येक माणसाला दिवसाला किती पाणी लागेल, याचा विचार करून तसे नियोजन करणे गरजेचे आहे. कणकवली शहरात हॉटेल्‍स मोठ्या प्रमाणात असून तेथे दिवसाला हजारो लिटर पाणी लागते. हे पाणी कुठून आणले जाते, याची माहिती घेऊन न. पं. प्रशासनाने नियोजन करून पाणी वाचविण्‍याचा प्रयत्‍न करावा. कणकवली शहरात अनेक पाणथळ भाग आहेत. नगराध्‍यक्ष असताना या भागांचे मी निरीक्षण केले आहे. त्‍यामुळे प्रशासनाला आवश्‍‍यकता असल्‍यास मी मदत करू शकतो. अशा पाणथळ भागांमध्‍ये बोअरवेल, विहीरी केल्‍यास पाणी उपलब्‍ध होऊ शकेल, असेही नलावडे म्‍हणाले.

कणकवली शहरात रोटरी कल्‍बसारख्‍या अनेक सामाजिक संस्‍था आहेत. या संस्‍थांना न. पं. प्रशासनाने सोबत घेऊन नियोजन करावे. पाणीटंचाई हे भीषण संकट असून त्‍यावर मात करण्‍यासाठी सर्वच संस्‍था सहभागी होतील, असा विश्‍‍वासही नलावडे यांनी व्‍यक्‍त केला. गतवर्षी १०१ टक्‍के पाऊस पडूनही उन्‍हाळ्यात शहराला पाणी कमी पडले होते. यावेळी ४० टक्‍के पाऊस कमी पडला आहे. त्‍यामुळे याबाबत न. पं. प्रशासनाने नागरिकांना सोबत घेऊन बैठका घ्‍याव्‍यात. हा विषय गंभीर असल्‍याने यात राजकारण होऊ नये, अशी अपेक्षाही नलावडे यांनी व्यक्त केली.