LIVE UPDATES

सिंधुकन्या महिला फॉर्मर उत्पादक कंपनीची सर्वसाधारण सभा

महिला शेतकरी, उत्पादन, आर्थिक सक्षमीकरणावर चर्चा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 01, 2026 12:28 PM
views 31  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सावंतवाडी : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महिलांच्या हाताला शेतीपूरक व्यवसायाची जोड मिळाल्यास आर्थिक स्वावलंबनाची नवी वाट खुलू शकते, या विचाराला बळ देत SMART प्रकल्पांतर्गत स्थापित सिंधुकन्या महिला फॉर्मर उत्पादक कंपनी लिमिटेड, माजगावची आर्थिक वर्ष २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. महिला शेतकरी, उत्पादन, बाजारपेठ आणि आर्थिक सक्षमीकरण यांचा समन्वय साधणाऱ्या या कंपनीच्या पुढील वाटचालीबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

या सभेला माजगाव जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, पंचायत समिती सदस्य शरद धाउसस्कर, वेत्ये गावचे सरपंच गुणाजी गावडे, मंडळ कृषी अधिकारी श्री. देवकर, मंडळ कृषी अधिकारी बांदा युवराज भुईंबर, यशवंत गव्हाणे, तसेच तालुका अभियान कक्ष सावंतवाडीच्या BMM/BM-IBCB स्वाती रेडकर, प्रभाग समन्वयक सुनिता मेस्त्री आणि कृषी व्यवस्थापक प्रिया गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करताना भविष्यातील संधी आणि आव्हानांवर प्रकाश टाकला.

यावेळी कंपनीच्या अध्यक्ष श्रीम. नितेशा नाईक, कोषाध्यक्ष श्रीम. रोशनी निब्रे, सचिव वैशाली गवस, तसेच शिवम प्रभागसंघाच्या अध्यक्ष श्रीम. मंजिरी गावकर व कोषाध्यक्ष श्रीम. रुपाली तारी यांच्यासह कंपनीचे सर्व संचालक, सीआरपी व एफएल सीआरपी उपस्थित होते. महिला सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती ही या उपक्रमाबद्दल वाढत असलेला विश्वास आणि सहभाग अधोरेखित करणारी ठरली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी सिंधुकन्या महिला फॉर्मर उत्पादक कंपनीच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. महिला भगिनींना केवळ शेतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांना उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच मिळणे गरजेचे असल्याचे सांगत, महिलांच्या आर्थिक सुबत्तेसाठी आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनीही कंपनीच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तर वेत्ये गावचे सरपंच गुणाजी गावडे यांनी स्थानिक पातळीवर महिला शेतकरी व उत्पादकांना एकत्रित करून कंपनीच्या माध्यमातून अधिक व्यापक आर्थिक संधी निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. महिला फॉर्मर उत्पादक कंपनी ही केवळ शेतकरी महिलांची संघटना न राहता सामूहिक उत्पादन, प्रक्रिया, ब्रँडिंग, बाजारपेठेचा शोध आणि उत्पन्नवाढीचे प्रभावी व्यासपीठ ठरू शकते. 

व्यक्तिगत पातळीवरील शेती उत्पादनाला संघटित स्वरूप दिल्यास उत्पादन खर्चाचे नियोजन, बाजारपेठेतील सौदेबाजीची क्षमता आणि उत्पादनाला योग्य दर मिळविण्याच्या संधी वाढू शकतात.यामुळे सिंधुकन्या महिला फॉर्मर उत्पादक कंपनीसमोर आगामी काळात स्थानिक कृषी उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे, मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे, महिलांचे कौशल्यविकास प्रशिक्षण वाढविणे आणि ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे मोठे आव्हान तसेच संधी आहे. SMART प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधींचा प्रभावी वापर केल्यास माजगाव परिसरातील महिला शेतकऱ्यांसाठी ही कंपनी आर्थिक परिवर्तनाचे महत्त्वाचे केंद्र ठरू शकते.

 सभेच्या निमित्ताने महिला भगिनींची मोठ्या संख्येने झालेली उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. महिलांचा वाढता सहभाग, लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि कृषी विभाग व अभियान कक्षाचे मार्गदर्शन या त्रिसूत्रीच्या बळावर ‘सिंधुकन्या’ची वाटचाल अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. ग्रामीण महिलांच्या श्रमाला संघटित आर्थिक शक्तीची जोड मिळाल्यास कुटुंबाच्या उत्पन्नाबरोबरच संपूर्ण गावाच्या अर्थचक्रालाही गती मिळू शकते. त्यामुळे ‘सिंधुकन्या’च्या माध्यमातून माजगावच्या मातीतून महिला आर्थिक स्वावलंबनाचा नवा अध्याय लिहिला जात असल्याचे चित्र या वार्षिक सभेत पाहायला मिळाले.