
वैभववाडी : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप करत नाधवडे येथील रस्त्याच्या कामाची क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत तपासणी करावी, तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
येथील पंचायत समिती सभागृहात मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन सुरू असताना राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा विषय चर्चेला आला. यावेळी सभापती सिद्धेश रावराणे आणि सदस्य देवानंद पालांडे यांनी महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.सभापती रावराणे म्हणाले, “तळेरे-कोल्हापूर मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
काँक्रीट रस्त्यावर ब्लॉक लावण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत. नाधवडे येथील पुलावर लोखंडी सळ्या वर आल्या आहेत. या ठिकाणी अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.नाधवडे येथे करण्यात आलेले कार्पेट पूर्णपणे उखडले असून, या कामाची तातडीने क्वालिटी कंट्रोल विभागाकडून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच संबंधित ठेकेदाराने काम करताना सीसीटीव्हीच्या केबल तोडल्या असून, त्या अद्याप जोडण्यात आलेल्या नाहीत. गणेश विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या मार्गाचे कामही निकृष्ट झाले असून, केलेले काम वाहून गेले आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.तळेरे ते करूळदरम्यान अनेक जोडरस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. ठेकेदाराने सर्वत्र रस्त्यांची दुर्दशा करून ठेवली आहे, अशा शब्दांत सभापती रावराणे यांनी नाराजी व्यक्त केली. कामाच्या दर्जाची तातडीने तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी सदस्य देवानंद पालांडे यांनीही या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. हा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांच्या पातळीवर सुटत नसेल, तर पुढील बैठकीस राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना उपस्थित राहण्यास सांगावे, अशी सूचना त्यांनी केली. दरम्यान, या संपूर्ण विषयावर स्वतंत्र आढावा बैठक घेण्याचे निर्देश सभापती रावराणे यांनी दिले. रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारला नाही आणि संबंधित विभागाने योग्य ती कार्यवाही केली नाही, तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.












