
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील एकाकी ज्येष्ठ नागरिकांना आधार देतानाच तीव्र कुपोषित बालकांना मायेचा हात देण्याचा स्तुत्य उपक्रम सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून हाती घेण्यात आला आहे. 'कुपोषणमुक्त सिंधुदुर्ग' हे स्वप्न साकार करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी स्वतः कुपोषित बालके दत्तक घेणार असून, ६५ वर्षांवरील एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांच्या आरोग्याची व दैनंदिन गरजांची नियमित काळजीही घेतली जाणार आहे. खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त या दोन महत्त्वाकांक्षी सामाजिक उपक्रमांची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केली.
जिल्हा परिषद अध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपाध्यक्ष दादा साईल, सभापती संतोष साटविलकर, प्रीतेश राऊळ, रुहिता तांबे, सदस्य संदीप गावडे, सावी लोके तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी उपस्थित होत्या.
प्रमोद कामत यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ६५ वर्षांवरील तसेच एकटे राहणाऱ्या नागरिकांचा सर्वेक्षण सुरू असून, त्यानंतर आरोग्य सेविका व आरोग्य सेवक महिन्यातून किमान एकदा त्यांच्या घरी भेट देणार आहेत. या भेटीत ज्येष्ठांच्या आरोग्याची तपासणी, त्यांच्या अडचणी जाणून घेणे, आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून देणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे एकाकी ज्येष्ठांना केवळ वैद्यकीयच नव्हे, तर सामाजिक आधारही मिळणार आहे.
दुसरीकडे, जिल्ह्यातील तीव्र कुपोषित २२ बालके जिल्हा परिषद अध्यक्ष, पालकमंत्री, पदाधिकारी आणि अधिकारी दत्तक घेणार आहेत. या बालकांच्या पौष्टिक आहारासाठी तसेच आवश्यक औषधोपचारासाठी होणारा अतिरिक्त खर्च संबंधित दत्तक पालक उचलणार आहेत. आरोग्य विभाग व महिला व बालविकास विभागाच्या प्रयत्नांना यामुळे मोठे बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सध्या जिल्ह्यात ३७६ कमी वजनाची बालके असून, ती पुन्हा कुपोषणाच्या विळख्यात अडकू नयेत यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. नियमित आरोग्य तपासणी, सकस पोषण आहार आणि पालकांचे समुपदेशन यावर विशेष भर दिला जाणार असल्याचेही कामत यांनी स्पष्ट केले.
समाजातील सर्वात संवेदनशील घटक असलेल्या चिमुकल्यांचे पोषण आणि ज्येष्ठांच्या सन्मानपूर्ण जीवनाची जबाबदारी स्वीकारत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याची भावना या उपक्रमातून व्यक्त होत आहे.











