
नगराध्यक्षांचे भाऊ थोडक्यात वाचले
दोडामार्ग : दोडामार्ग शहरातील सुरुचीवाडी येथे रविवारी धक्कादायक प्रकार घडला. निवासी घराच्या आवारात दारू पिण्यास आणि गैरकृत्य करण्यास मज्जाव केल्याच्या रागातून एका अनोळखी तरुणाने जिम चालकासह दोघांना चाकू दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रोहन चव्हाण यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात संशयिताविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसई-दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचे भाऊ तथा जिम चालक रोहन सुभाष चव्हाण (वय ३७) हे रविवारी आपल्या घरी होते. यावेळी त्यांच्या घरासमोरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या कंपाऊंडमध्ये एक अनोळखी तरुण दारू पित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच त्याच्यासोबत असलेली एक तरुणी त्या ठिकाणी गैरप्रकार करत असल्याचेही दिसून आले.
निवासी परिसर असल्याने आणि कुटुंब राहत असल्याने चव्हाण यांनी त्या तरुणाला येथे असे प्रकार करू नका, अशी समज दिली. मात्र याचा राग मनात धरून संबंधित तरुणाने चव्हाण यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. याच वेळी बाजूला असलेल्या टीव्हीएस शोरूमचे मॅनेजर शुभम मुळगांवकर हे घटनास्थळी आले.
चव्हाण आणि मुळगांवकर यांनी त्या तरुणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शिवीगाळ करत तो गेटबाहेर गेला. त्यानंतर चव्हाण आणि मुळगांवकर आत जात असताना त्या तरुणाने कारमधून चाकू काढला आणि दोघांच्या दिशेने धावत आला.
चाकूने वार करण्याच्या उद्देशाने आलेल्या त्या तरुणाने दोघांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या दोघांनी बाजूला पळ काढला. त्यानंतर संशयित तरुण आपल्या मैत्रिणीसह स्वीफ्ट कारमधून घटनास्थळावरून पसार झाला.
या घटनेनंतर रोहन चव्हाण यांनी शुभम मुळगांवकर व मित्रांसह तात्काळ दोडामार्ग पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयिताविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कलम १३५, ३७(१) तसेच भारतीय न्याय संहितेतील १३१, ३२९(३), ३५१(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, कारच्या नंबर प्लेटच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.














