
कणकवली : शहरातील हॉटेले, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे आणि टपऱ्यांवरील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्या पथकाने विशेष तपासणी मोहीम राबवली. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित अन्न मिळावे, तसेच शहरातील स्वच्छतेचा दर्जा कायम राहावा या उद्देशाने मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी शहरातील हॉटेलची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या अनुषंगाने कणकवली बस स्टँड समोरील काही हॉटेलची तपासणी करण्यात आली आहे.
तपासणीदरम्यान हॉटेल मालक व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परिसर स्वच्छ ठेवणे, अन्नपदार्थ झाकून ठेवणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे तसेच स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील टपरीधारकांनाही स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नगरपंचायतीने स्पष्ट इशारा देत सांगितले की, तपासणीदरम्यान कोणत्याही हॉटेल किंवा खाद्यपदार्थ विक्री केंद्रात अस्वच्छता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
ही तपासणी पथकाच्या प्रमुख अक्षता रोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी सुमित कुबल, विभव करंदीकर, सचिन नेरकर, सतीश कांबळे, अमोल आघम, सोनाली खैरे, रवी म्हाडेश्वर, रवींद्र गायकवाड, संतोष राणे, प्रधान राणे आणि संजय राणे हे उपस्थित होते. नगरपंचायतीने शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्वच्छतेचे नियम पाळून नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.











