
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथील बेल नदीजवळ दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडल्याची घटना आज घडली. या अपघातात एका कारचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या धडकेत दोन्ही वाहनांचे, विशेषतः अल्टो कारचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक अल्टो कार क्रमांक MH07 AB 0796 कणकवलीकडून गोव्याच्या दिशेने जात होती. याच दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या टाटा DI गाडी क्रमांक MH 10 CR 4054 गाडीशी पावशी बेल नदीजवळ तिची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की अल्टो कारच्या पुढील भागाचा पार चक्काचूर झाला आहे. या अपघातात अल्टो कारचा चालक गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच कुडाळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली.
अपघात नेमका कशामुळे झाला आणि याला कोण जबाबदार आहे, याचा अधिक तपास कुडाळ पोलीस करत आहेत.










